वाई : वाई वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ वाई न्हाळेवाडी (ता. वाई) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी विलास सहदेव सुर्वे (रा. न्हाळेवाडी) यांच्यावर कारवाई करून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
२९ मार्च रोजी विलास सुर्वे हे स्वत:च्या मालकीच्या शेताच्या बांधावर आग लावली असता आटोक्यात न आल्याने आग भडकली व राखीव वनक्षेत्रात पसरली. आगीची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन बोरीव येथील युवकांच्या मदतीने आग विझविली. तपास केला असता आग विलास सुर्वे यांनीच लावल्याचे निदर्शनास आले. यावरून सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, सहायक वनसंरक्षक सातारा सुरेश भडाळे, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झाजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रत्नकांत शिंदे, वनरक्षक जाधव, अ. शी. करडे, वनमजूर रवी वाघमारे यांनी भाग घेतला होता.