पेट्री : नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांची उधळण होऊन अनोख्या आविष्काराने सजणारे लाखो पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणाऱ्या कासपुष्प पठारावरील फुलांच्या कळ्या उमलण्यास सुरुवात झाल्याने पठारावरील निसर्ग हंगामासाठी सज्ज होत आहे. जागतिक वारसास्थळ, दुर्मीळ फुलांसाठी पर्यटकांची पंढरी कास पठारावर येत्या फुलांच्या हंगामात पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी, फुलांच्या संरक्षणासाठी कासपठार कार्यकारिणी समिती, वनविभागाद्वारे जय्यत पूर्वतयारी सुरू आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षापासून पर्यटनावर बंदी असल्याने गेल्या वर्षीचा कासच्या फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करता आला नसल्यामुळे कोट्यवधींचा उत्पन्नाचा फटका बसला. परिसरातील व्यावसायिकांवर उपासमार, अनेकांचे रोजगार गेले. पर्यटनावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यावसायिक, कामगारांसह संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून प्रशासनाने नियमावली बनवून कासच्या फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी होत होती. दरम्यान, बुधवारी संयुक्त कार्यकारी वनसमिती व वनविभागाच्या झालेल्या बैठकीतील सकारात्मक चर्चेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे तंतोतंत पालन करून येत्या बुधवारी, २५ ऑगस्टला ऑनलाइन बुकिंग करून आलेल्या पर्यटकांना प्रवेश देत चालू वर्षाचा हंगाम सुरू होणार असल्यामुळे स्थानिक व्यावसायिक, पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सध्या रानहळद बहरली असून तेरडा, गेंदरानगवर, सोनकी, आमरी, नीलिमा, कापरू, टुथब्रश, आबोलिमा, कुमुदिनी कमळे आदीसह शेकडो जाती-प्रजातींच्या फुलांच्या कळ्या तयार होत आहेत. ऊन-पावसाच्या पोषक वातावरणामुळे काहीच दिवसांत फुलांचे गालीचे तयार होण्याचे वातावरण झाले आहे.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे तंतोतंत पालन करून स्वच्छता, गाईड, ऑफिस, मोबाइल स्कॉड, पार्किंगसह सात विभाग पाडून सहा गावांतून साधारण १२० च्या आसपास स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे. महिलावर्गाचाही समावेश आहे. स्वयंसेवकांचे प्रशिक्षण होणार आहे.
- सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती
पॉइंटर करणे
उपलब्ध पर्यटन सुविधा...
१) कास पठार परिसर दर्शन बससेवा
२) पर्यटकांसाठी अचानक पाऊस आल्यास किंवा विश्रांतीसाठी कास पठारावरील टोलनाका तसेच राजमार्गावर चार निवाराशेड
३) स्वच्छतागृहांची व्यवस्था
४) शुद्ध पिण्याचे पाणी (मिनरल वॉटर)
५) पठारावरील फुले पाहण्यासाठी सततच्या पावसाने वाटा शेवाळून निसरड्या होतात. त्यामुळे फुले पाहण्यासाठी पठारावर जांभ्या दगडातील चार ठिकाणी पायवाटा
६) पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी, नियंत्रणासाठी १२०च्या आसपास स्वयंसेवकाची नेमणूक. पठारावर मोबाइल रेंज मिळत नसल्याने संपर्कासाठी कर्मचाऱ्यांकडे वाॅकीटाॅकीद्वारे संपर्क
७) पठारावर फुलांची माहिती देणारे, काळजीबाबतचे सूचनाफलक
८) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रित पर्यटनाला चालना देण्यासाठी ऑनलाइन बुकिंग उपलब्ध असून, याद्वारे दिवसाला तीन हजार पर्यटकांना प्रवेश
९) पर्यावरणपूरक पर्यटनासाठी कासच्या टोलनाक्यावर सायकली ठेवण्यात येणार असून, पठारावर फिरण्यासाठी एका तासासाठी शंभर रुपये शुल्क आकारून सायकल देण्यात येणार असल्याचे नियोजित
(छाया : सागर चव्हाण)