पेट्री : सातारा जिल्ह्यातील कास तलाव आणि कास पठार हे प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. सातारा पालिकेच्या दुर्लक्षामुळे या तलावाशेजारील कास बंगल्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा कास बंगला आहे की भूत बंगला, असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. कास तलाव आणि कास पठार पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिमेला नजर वळताच कास तलाव आणि पठार पाहण्याचा बेत पक्का केला जातो. या ठिकाणी प्रत्येक ऋतूत पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते.सातारा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत खास करून या परिसरात पर्यटन करण्यास प्रथम पसंती देतात. परंतु तलावाशेजारीच बसून मद्याचे पेग रिचवणारे काचेच्या बाटल्या तेथेच फोडतात. त्यामुळे कास तलाव भविष्यात ‘काच तलाव’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काचा, प्लास्टिक पिशव्या, जेवणाच्या डिशेस, ग्लास व कागदाच्या बोळ्यांनी कास परिसर अस्वच्छ झाला आहे. पश्चिम घाट हे २०१२ मध्ये जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. परंतु या अस्वच्छ तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे कित्येक पर्यटक या परिसरात फिरण्यास ना पसंती दर्शविताना दिसत आहेत. (वार्ताहर)बंगल्यात चुलीचा धूर...कास तलावाशेजारीच सातारा पालिकेच्या मालकीचा बंगला आहे. परंतु हा बंगला डागडुजीच्या संदर्भात कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेला असून, त्याच्या दयनीय अवस्थेतूनच कास बंगल्याला वाली कोण?, असा प्रश्न समोर येताना दिसत आहे. दारे, खिडक्या मोडल्याने बंगल्याची दुरवस्था झाली आहे. बंगला कुलूपबंद नसल्याने दिवसा पर्यटक व रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचा वावर पाहायला मिळतो. सतत उघड्या दारांमुळे बंगल्यात चुली मांडून बिनधास्त संगीताच्या तालावर पार्ट्या झोडतानाचे चित्र दिसत आहे. चुलीच्या धुराने एक वेगळाच बेरंग बंगल्याला आलेला दिसून येत आहे. तरीही प्रशासनाचे या बाबीकडे अजून लक्ष नाही. कित्येक प्रेमीयुगुले आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत चक्क बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर आपापल्या निशाणी कोरताना दिसत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई कास पठार परिसरात सज्ज झालेली दिसून येते. दरम्यान, थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी बऱ्याच तरुणाईने पार्ट्या करण्याचे बेत आखलेले असून, कोणतेही विध्वंसक कृत्य घडू नये यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींतून बोलले जात आहे. दरम्यान, पठारावर फिरायला येणाऱ्यांकडून वणवे लागू नये, यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती, वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत. भांडी पाण्यात धुवत असल्याने पाण्यातील जीवांना धोका पोहोचत आहे.
कास बंगला बनलाय दुर्लक्षाचा भूत बंगला!
By admin | Published: December 29, 2016 10:24 PM