कऱ्हाड : विंग (ता. कऱ्हाड) येथील काबाडकी नावाच्या शिवारात ऊसतोडणी सुरू असताना तीन पिल्ले आढळून आली होती. ही पिल्ली बिबट्याची असल्याची अफवा पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, ती पिल्ली बिबट्याची नसून रानमांजराची असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सध्या विंग परिसरात ऊसतोडणी वेगाने सुरू आहे. येथील कबाडकी नावाच्या शिवारात चार दिवसांपूर्वी ॲड. महेश खबाले-पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना मजुराला तीन पिल्ले सापडली. तांबूस काळ्या रंगाची ती पिल्ले होती. माणसांची चाहूल लागताच ती गुरगुरू लागली. काही वेळातच ती पिल्ले बिबट्याची असल्याचे गावात समजले. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी झाली.याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी पाहणी केल्यानंतर संबंधित पिल्ले बिबट्याची नसून रानमांजराची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. संबंधित पिल्लांना वन विभागाने ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी, नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
..अन् शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास, विंगच्या शिवारात आढळलेली पिल्ली रानमांजराची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 7:10 PM