आॅनलाईन लोकमतदहिवडी (जि. सातारा), दि. १0 : दुष्काळी माण तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील महिलांनी सुरू केलेल्या पशुसंवर्धनाच्या कामाचा डंका सातासमुद्रापार पोहचला असून या कामाची माहिती घेण्यासाठी थेट कॅनडा येथून जागतिकबँकेच्या पशुतज्ज्ञ डॉ. हेलन लीश या दहिवडी येथे आल्या होत्या. आर्थिक उन्नतीसाठी महिलांनी स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ठोस व्यवसायाची निवड करावी, असे मत पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात ग्रामीण महिलांचे योगदान पाहून त्यांनी महिलांशी संवाद साधताना व्यक्त केले.पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम योजना राबविली जाते. या उपक्रमांतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने माण तालुक्यातील महिलांना पशुधनाच्या आरोग्याबाबत गावामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षीत करण्यात आले आहे. जनावरांना लसीकरण, माडग्याळ, उस्मानाबादी शेळ्यांचे वजन करणे, जनावरांच्या गोठयाची स्वच्छता ठेवणे आदी बाबींचे शास्त्रीय प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आता या महिला गावात पशुधनाबाबत जागृतीचे काम करतात. याचा आढावा घेण्यासाठी कॅनडाच्या जागतिक बँकेच्या पशुतज्ज्ञ डॉ. हेलन लीश सातारा येथे आल्या होत्या. त्यांनी माण तालुक्यातील महिलांच्या उपक्रमाला भेट दिली. फारसे शिक्षण नसलेल्या पण प्रशिक्षीत असलेल्या महिला पशुसंवर्धनाचे काम व्यवस्थित करत असल्याचे पाहून डॉ. हेलन यांनी महिलांचे कौतुक केले.याशिवाय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विनोद पवार व त्यांच्या टीमने महिलांना दिलेले प्रशिक्षण मोलाचे ठरत असल्याचे देखील डॉ. हेलन यांनी नमूद केले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन खाडे, माण तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मनिषा नेटके, डॉ. अनिल चपणे, डॉ. पांडुरंग वाघमोडे, डॉ. तारळेकर, डॉ. इनामदार यांची उपस्थिती होती.
बँकेकडून स्वयंचलित दुचाकी निधी...
शेळ्या-मेंढ्यांच्या उपचारासाठी महिलांना शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाण्यासाठी पायपीट करावी लागते. ती वाचण्यासाठी त्यांना दुचाकीची गरज आहे. यासाठी महिलांना दुचाकी खरेदी करण्यासाठी बँकेकडून अर्थसहाय्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.दहिवडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे डॉ. हेलन लिश यांनी भेट देऊन प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. प्रियंका कुंदूर, डॉ. पांडुरंग येडगे यांच्याशी चर्चा केली. मेष पैदास केंद्रातील माडग्याळ व उस्मानाबादी प्रजातीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या हितावह माहिती घेतली.