नितीन काळेल ।सातारा : दुष्काळी भागातील पशुधन वाचावे म्हणून राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला; पण चालकांना ३० जूनपर्यंतच छावण्या सुरू ठेवता येणार आहेत. कारण, पुढील आदेशाचे पत्र चालकांच्या हातात पडलेच नाही. त्यामुळे छावणीच्या आश्रयाला असणारी जनावरे घरच्या दावणीला येणार असून, पुरेसा पाऊस अन् चाराही नसल्याने शेतकºयांच्या डोक्याचा पार भुगा झालाय.
गेल्यावर्षी राज्यात अपुरा पाऊस झाला, त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळाची चाहूल लागली होती. परिणामी राज्य शासनालाही आॅक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर करून उपाययोजना सुरू कराव्या लागल्या होत्या. त्यावेळी सातारा जिल्ह्यातही दुष्काळाची मोठी दाहकता होती. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्यात दिवाळीनंतरच पाणी आणि चारा टंचाईची स्थिती निर्माण झालेली. त्यावेळी राज्य शासनामधील मंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागाचे दौरे करून माहिती घेतली. नोव्हेंबरमध्ये तर मंत्री एकनाथ शिंदे दुष्काळी दौºयावर आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. तेव्हा माण तालुक्यात चारा नाही, त्यामुळे लवकरच छावण्या सुरू कराव्या लागतील, असे स्पष्ट केले होते; पण प्रत्यक्षात छावण्या पाच महिने उशिरा म्हणजे एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या.
सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यात ९८ चारा छावण्या सुरू असून, त्यामध्ये ७२ हजारांहून अधिक पशुधन आश्रयाला आहे. माण तालुक्यात मोठी दाहकता आहे. माणमध्ये ८१ छावण्यांना मंजुरी असलीतरी प्रत्यक्षात ७६ सुरू असून, त्यामध्ये ५७ हजार ४१७ जनावरे आहेत. खटाव तालुक्यात १५ छावण्या सुरू असून, ७ हजार ७२६ जनावरे तर फलटणमध्ये ५ छावण्यात ५ हजार २९१ जनावरे आहेत. या जनावरांना शासनाच्या नियमाप्रमाणे चारा, खाद्य आणि पाणी मिळत असलेतरी ते ३० जूनपर्यंतच देण्यात येणार आहे., त्यामुळे शेतकºयांसमोर अडचण निर्माण झालीय.
शासन आदेशानुसार ३० जूनपर्यंतच चालकांना छावण्या सुरू ठेवता येतील. कारण, त्यापुढील काहीच आदेश जिल्हा पातळीवर प्राप्त नाही. त्यामुळे अनेक चालकांकडून छावणीतील शेतकºयांनाही ३० जूनपर्यंतच छावणी सुरू राहील, असं तोंडी सांगण्यात आलंय, त्यामुळे शेतकºयांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, अद्यापही दुष्काळी भागात म्हणावसा पाऊस झालेला नाही.
काही ठिकाणी तर पूर्ण पाठ फिरवलीय. त्यामुळे जनावरे घरी नेली तर चारा कोठून आणायचा? विकत घ्यायचा झाला तर जवळपास ५०-६० किलोमीटरमध्ये तो मिळणं अवघड आहे. तसेच त्यासाठी पैसे कोठून आणायचे ? असे एक ना अनेक प्रश्नांचे मोहळ शेतकºयांभोवती घोंगावत आहे. त्यासाठी शासन स्तरावर निर्णय होऊन पाऊस चांगला होईपर्यंत आणखी दोन-तीन महिने तरी छावण्या सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.शासनाच्या धोरणाबद्दल अधिकारी अनभिज्ञजिल्ह्यातील चारा छावण्यांना ३० जूनपर्यंतच मुदत असल्याचे अधिकाºयांनी मान्य करत पुढील काही निर्णय आमच्याकडे आला नसल्याचे सांगितले. तसेच शासन छावण्यांची मुदत पुढे वाढविण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणार का? याबद्दलही अधिक सांगण्यास नकार दिला. त्यामुळे शासनाचा निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे. नाहीतर छावणीची जनावरे चारा नसणाºया दावणीला आणावी लागणार आहेत.
चारा छावण्यांना ३० जूनपर्यंत मुदत आहे. असे असलेतरी दुष्काळी भागात अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील जनावरांना छावणीचाच आधार आहे. शासन शेतकºयांच्या बाजूने निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. तसेच आमची वरकुटे मलवडी येथील सद्गुरू हरिबुवा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे चालविली जाणारी छावणी सामाजिक बांधिलकीतून या पुढेही सुरू ठेवूून शेतकºयांना दिलास देऊ.- शिवाजीराव शिंदे, छावणी चालकअनेक ठिकाणी पाऊस झाला नाही, त्यामुळे आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू ठेवणे आवश्यक आहे. तसे होणार नसेल तर शासनाला छावण्या सुरू ठेवण्यास भाग पाडू. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झालीय. तेही आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक आहेत.- जयकुमार गोरे, आमदार