सातारा : सातारा शहर पोलिसांनी सराईत चोरट्याला पकडून दुचाकी चोरीचे दोन आणि घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आणला. तसेच संबंधिताकडून १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये फ्रीझ, सिलिंडर टाक्या, पंखा, दुचाकीचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जीवन शहाजी रावते (वय २४, रा. दत्तनगर कोडोली, सातारा) असे चोरट्याचे नाव आहे. तर दि. १६ एप्रिल रोजी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी रेकाॅर्डवरील एक चोरटा दुचाकीवरुन वेल्डिंग मशीन घेऊन फिरत असताना आढळून आला. चाैकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर तो पळून जावू लागला. त्यामुळे पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याचे नाव जीवन रावते असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याच्याकडील वेल्डिंग मशीनच्या मालकी हक्काबाबत माहिती विचारल्यावर त्याला ती देता आली नाही. कसोशीने अधिक माहिती घेतली असता दोन दुचाकी चोरीचे आणि चंदननगर (सातारा) येथील एका बंद घरातील साहित्य चोरी केल्याचे त्याने सांगितले. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून एक फ्रीज, दोन एलसीडी, दोन सिलिंडर टाक्या, पंखा तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम आदींनी सहभाग घेतला.
चोरट्यावर ११ गुन्हे नोंद
पोलिसांनी पकडलेला चोरटा जीवन रावते याच्यावर चोरी आणि घरफोडीचे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. आता पोलिसांनी सातारा शहर आणि सातारा तालुका पोलिस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.