सातारा : अपघातात पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीवरच बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनीच फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील माजगाव येथील राजेश विठ्ठल गायकवाड (३५, रा. माजगाव, ता. सातारा) हे आपली पत्नी अश्विनी हिच्यासमवेत दुचाकीवरून (एम. एच. ११ - एसी ९०११) निघाले होते. ते भरधाव वेगाने दुचाकी चालवित होते. माजगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल निसर्गजवळ आल्यानंतर भरधाव वेगामुळे त्यांची दुचाकी स्लीप झाली. यात पाठीमागे बसलेल्या अश्विनी राजेश गायकवाड (२८) या खाली पडल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
दरम्यान, पोलिसांनी केलेला पंचनामा आणि घटनास्थळावरील माहिती लक्षात घेता अश्विनी यांच्या मृत्यूस पती राजेश गायकवाड कारणीभूत असल्याचे समोर आले. यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर काशिनाथ सुर्वे (४२) यांनी राजेश याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरले असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महाडिक हे करीत आहेत.