सातारा : पुणे - बंगळुरू महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत बेदरकारपणे रिक्षा चालवून मागे बसलेल्या प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विनोद धोंडिराम धेंडे (४३, रा. मुंबई, मूळ रा. बेनापूर, ता. खानापूर जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिक्षाचालक विनोद धेंडे हे दि. ११ फेब्रुवारी रोजी रिक्षा (क्र. एमएच ०३ सीटी ३३०५) घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना तसेच विमाही नव्हता. पुणे - बंगळुरू महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून ते रिक्षा बेदरकारपणे, अविचाराने चालवत होते. शेंद्रे गावच्या हद्दीत आले असताना विनोद धेंडे याने रिक्षाला कट मारल्यामुळे मागील सीटवर बसलेले मोहन शिवा कांबळे (वय ५०) हे रस्त्यावर पडले. यात त्यांच्या डोक्याला, हात, पाय, चेहऱ्याला गंभीर जखम झाली. यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मोहन कांबळे यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू असल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आली. दरम्यान, या अपघाताची चौकशी सातारा तालुका पोलीस ठाण्यातून सुरू असताना जखमी मोहन कांबळे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार समीर बाळकृष्ण महांगडे (वय ३२) यांनी रिक्षाचालक धेंडे याच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे करत आहेत.