कुडाळ : जावळी तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच गेल्या आठवड्यापासून तालुक्यात पुन्हा नव्याने कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असून, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून सुरू असलेली कोरोनाची महामारी आता वर्ष होत आले तरी सुरूच आहे. हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच गेल्या आठवड्यापासून काही काळ थांबलेला कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. नागरिकांचा बेजबाबदारपणाच याला कारणीभूत आहे. वाढती गर्दी, आठवडे बाजार, लग्नसमारंभ, यात्रा, धार्मिक कार्यक्रम आदींना लोकांची ये-जा सुरू झाली. अशातच कोरोना आता संपला, असे म्हणून लोकही बिनधास्त वावरू लागले. नाकावरचा मास्क अलगत तोंडाखाली येऊ लागला. सामाजिक अंतराचे नियम काहीसे शिथिल होत सगळीकडेच मोकळेपणा जाणवायला लागला होता.
शासनाकडून लसीकरण मोहीम सुरू झाल्याने आता कोरोना पळून गेला, असेच काहींना वाटू लागले. मात्र, गेल्या आठवड्यात तालुक्यातील कावडी याठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने सारेच खडबडून जागे झाले. भागातील करहर, करंदी तर्फ कुडाळ, म्हसवे, आर्डे, करंजे, कुडाळ याठिकाणी नवीन रुग्ण सापडले आहेत. यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगली पाहिजे. आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.
(कोट)
गेल्या आठवडाभरात तालुक्यात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. आरोग्य विभागाचे यावर बारकाईने लक्ष असून ज्याठिकणी अधिक संख्या आहे, तेथे कंटेन्मेंट झोन केला आहे. तालुक्यातील १८ आरोग्य समुदाय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावात पूर्वीप्रमाणेच लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी विनामास्क फिरू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे आणि वारंवार साबणाने हात धुवावेत, तसेच अनावश्यक गर्दीही करू नये, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.
- डॉ. भगवान मोहिते, जावळी तालुका वैद्यकीय अधिकारी