वाई : पोलीस खात्यातील मनुष्यबळाची मर्यादा व वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी, वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी तसेच गुन्हेगारी कारवायांवर वचक ठेवण्यासाठी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात आली आहे.
शहरात विविध ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे व स्पीकर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक अजित टिके यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
भीमनगर, बावधन नाका, न्यायालय परिसर, एसटी स्टँड, शिवाजी चौक, गणपती घाट, गोविंद रामेश्वर मंगल कार्यालय, शाहीर चौक, भाजी मंडई, किसन वीर चौक, धुंडी विनायक चौक, जामा मस्जिद, चावडी चौक, कॉलेज रोड, सायली कट्टा आदी ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले. तर किसन वीर चौक, भाजी मंडई गणपती घाट, एसटी स्टँड या वर्दळीच्या मुख्य ठिकाणी स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या कॅमेऱ्याच्या माध्यमांतून पोलीस ठाण्यातून अधिकारी, कर्मचारी यांना कायदा सुव्यवस्था व वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
स्पीकर बसविल्यामुळे वाहतूक समस्या व तातडीच्या प्रसंगी सूचना देणे सोयीस्कर होणार आहे. याशिवाय गुन्हे घडण्यापूर्वीच खबरदारी घेण्याच्या सूचनांमुळे गुन्हेगारी कारवायांवर प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. प्लॅनेट इलेक्ट्रिकल्सचे अतुल जगताप यांनी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर अत्याधुनिक व उच्च दर्जाची यंत्रणा बसवून दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिळक, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, नाईक प्रशांत शिंदे, कांताराम बोराडे यांनी लोकसहभाग मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वाई शहरात या यंत्रणेची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.