सातारा : सैदापूर (ता. सातारा) हद्दीत स्वामी विवेकानंदनगर वसाहतीत पोलिसांनी टाकलेल्या छाप्याच्या खऱ्या हालचाली दुपारी दीड वाजल्यापासूनच सुरू होत्या. तरीही मुद्देमालाची मोजदाद, इमारतीची झडती, पंचनामे अशी कामे रात्री उशिरापर्यंत सुरूच होती, यावरून या कारवाईचा आवाका लक्षात येतो. या कारवाईत पोलिसांनी ५२ जणांना ताब्यात घेतले. ‘येथे जुगार, मटका खेळला जात नाही,’ असे फलकावर लिहिलेले असले, तरी तेथे पैसे लावून ‘तीनपत्ती’चे डाव सुरू होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत याच इमारतीत होते. सापडलेले पैसे, साहित्य, वाहने यांच्या नोंदी सुरू होत्या. कारवाईत बारा दुचाकी वाहने वाहतूक शाखेच्या क्रेनवरून नेण्यात आली, तर तीन चारचाकी वाहनेही ताब्यात घेण्यात आली. इमारतीच्या तळमजल्यावर येरळे कुटुंब वास्तव्यास आहे. दुसऱ्या मजल्यावरील छाप्याची कारवाई पूर्ण झाल्यावर या घराची झडती घेण्याचे काम सुरू झाले. कुटुंबीयांकडे चौकशी केली जात होती. अगदी स्वयंपाकघरातील डबेही उघडून पाहिले जात होते. जेथे ‘यशवंत स्पोर्टस अँड चॅरिटेबल ट्रस्ट’ असा फलक लावून कॅरम, बुद्धिबळ आणि पत्त्यांचे डाव सुरू होते, त्या ठिकाणी आरामदायी बैठकव्यवस्था करण्यात आल्याचे दिसले. टेबल-खुर्च्यांसह गाद्यागिरद्यांचीही रेलचेल होती. सूचनाफलकावर ‘फक्त सभासदांनाच प्रवेश दिला जाईल,’ असे लिहिले होते. अड्ड्यावर ताब्यात घेण्यात आलेले अनेकजण चारचाकी घेऊन आलेले. त्यांची नावे उशिरापर्यंत पोलिसांनी जाहीर केली नसली, तरी यातील बऱ्याच व्यक्ती प्रतिष्ठेच्या व्यवसायातील आहेत, हे स्पष्ट झाले आहे. दोन पोलीस व्हॅनमधून त्यांना रात्री तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. इमारतीला सीसीटीव्हीचा पहारा, सूचनाफलकावरील मजकूर, सापडलेला मुद्देमाल आणि पोलिसांच्या कारवाईवेळी निसार आत्तार याने घाबरून तिसऱ्या मजल्यावरून मारलेली उडी या साऱ्याचा अन्वयार्थ पोलिसांना लावावा लागणार आहे. (प्रतिनिधी)पोलिसांनी धाड टाकल्यानंतर या बंगल्यातील मंडळींची झाडून तपासणी केली. एकाच्या खिशातील कागदपत्रांचीही चौकशी करताना पोलीस.सुटकेस संबंधीत मालकाने उघडून पोलिसांना दाखवली.अबब... पत्त्यांचे शेकडो कॅट याठिकाणी आढळून आले.असे अनेक एअरकंडीशन अन् सीसीटीव्ही कॅमेरे येथे होते.चारमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कॅरम बोर्ड, बुद्धिबळाचे पट आणि पत्ते. ‘रमी हा बुद्धिकौशल्याचा खेळ आहे,’ अशी सूचना फलकावर लिहिलेली. मात्र, हे खेळ ज्या इमारतीत खेळले जातात, तिच्या चारही बाजूंनी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे. प्रत्येक जिन्यात असाच कॅमेरा बसविलेला. या अत्याधुनिक यंत्रणेमागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत पोलीस करीत होते. सुगावा नाही..या अड्ड्यावर पकडण्यात आलेले काहीजण सातारचे तर काही शिरवळ, वडूज, खटावचे आहेत, असे माहीतगार सूत्रांनी सांगितले. येथे आरामदायी बैठकव्यवस्थेसह एअर कंडिशनर बसविण्यात आलेले. ‘खेळायला’ आलेल्या अनेकांच्या चारचाकी गाड्यांना ‘व्हीआयपी नंबर’. अशा या हाय प्रोफाइल अड्ड्याचा सुगावा पोलिसांना जरा उशिराच लागला अशी प्रतिक्रिया घटनास्थळी काहीजणांनी व्यक्त केली.
पत्ते कुटण्यासाठी सीसीटीव्ही अन् एसी
By admin | Published: March 29, 2015 11:12 PM