जगदीश कोष्टी ।सातारा : महाविद्यालय परिसर म्हटला की रस्त्यावर टोळक्या टोळक्याने बसणारी तरुणाई, रस्त्यावरून निघालेल्या तरुणींची छेडछाड, टिंगल टवाळी हे प्रकार सर्रास घडतात; पण याला सातारा अपवाद ठरू पाहत आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय मार्गावर तब्बल बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन युवतींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.
साता-यातील शिक्षणपद्धती जिल्ह्यात चांगली मानली जाते. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांतून युवक-युवती शिक्षणासाठी साता-यात येतात. यामध्ये यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, आझाद कॉलेज, रयत इंग्लिश मीडियम स्कूल अन् अण्णासाहेब कल्याण विद्यालय हे सर्व एकाच परिसरात असल्याने हे ठिकाण शैक्षणिक केंद्र बनले आहे.
शिक्षणाच्या निमित्ताने येथे येणा-या बहुतांश तरुणी ग्रामीण भागातून दररोज ये-जा करतात. एसटी मध्यवर्ती बसस्थानकातून जाणा-या तरुणींना काही सडकसख्याहरींचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पालकांच्या आग्रहावरून यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय परिसरात निर्भया पथक तैनात केले जात होते. परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या तरुणांवर महिला पोलीस कारवाई करत असत. त्यानंतर या ठिकाणी पोलीस चौकी तयार केली. याचा चांगलाच फायदा झाला. त्यापाठोपाठ आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. महाविद्यालयात येणाºया प्रत्येक मार्गावर तोंड करून कॅमेरे बसविले आहेत. त्याचे नियंत्रण निर्भया पोलीस केंद्रात असल्याने गुन्हांवर आळा बसणार आहे.
दरम्यान, आमच्या महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे रोडरोमिओंवर आळा बसला आहे. मुलींची छेडछाड, भांडणे कमी झाली आहेत. आता पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित वाटते, अशा भावना पूजा कदम हिने व्यक्त केल्या.