सातारा : शाहूपुरी येथे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले असून, ते केवळ नावापुरतेच उरले आहेत. ‘तिसरा डोळा’ निकामी झाल्याने या भागातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी भागासाठी पूर्वी स्वतंत्र ग्रामपंचायत होती. सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर ही ग्रामपंचायत बरखास्त झाली अन् हा भाग पालिकेत समाविष्ट झाला. या ग्रामपंचायतीच्या वतीने शाहूपुरीतील जुना जकात नाका परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. जवळच असलेल्या एका मंदिरातून या चौकातील बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवले जात होते; मात्र ही यंत्रणा अल्पजीवी ठरली. काही महिन्यांतच या सीसीटीव्हींनी माना टाकल्या अन् नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.शाहूपुरी भाग पालिकेत समाविष्ट झाल्याने या भागात पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी आता पालिका प्रशासनाच्या खांद्यावर आली आहे; मात्र हद्दवाढीच्या दोन वर्षांनंतरही या भागाचा विकास कासवगतीने सुरू आहे. येथील कचरा संकलनाचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे आजवर मुजविण्यात आले नाही. सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही नावापुरतेच उरले आहेत. अशा एक ना अनेक समस्यांनी हा भाग ग्रासला असून, पालिका प्रशासनाने या भागाचा विकास साधण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत.नागरिकांची सुरक्षा महत्त्वाचीचशाहूपुरी परिसरात पूर्वी भुरट्या चोऱ्यांचे व चेन स्नॅचिंगचे प्रकार सातत्याने घडत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अशा प्रकारांना आळा बसला होता. सध्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून या भागात गस्त घातली जात आहे; मात्र सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू झाल्यास ही सुरक्षितता अधिक भक्कम होईल. त्यामुळे पालिका प्रशासनाने ही यंत्रणा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
एखादी चोेरीची अथवा चेन स्नॅचिंगची घटना घडल्यास चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हा महत्त्वाचा दुवा ठरतो. शाहूपुरी हा भाग विस्ताराने मोठा व संवेदनशील आहे. त्यामुळे पालिकेने विशेष तरतूद करून या भागात सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी. - संकेत परामणे, रहिवासी, शाहूपुरी