प्रगती जाधव-पाटील ।सातारा : जिल्हा कारागृहात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डोळा चुकवून आदेश न पाळणाºया बंदिवानांना ‘प्रसाद’ अर्थात मार देण्याची खास जागा कारागृहात आहे. कारागृहातील बंदिवानांसह साहेबांच्या आॅफिसशेजारी असणारे आंब्याचे झाड या ‘प्रसाद’ वाटपाचे मूक साक्षीदार असल्याचे बोलले जात आहे.
कारागृह प्रशासनावर बंदिवानांकडून होणाºया चुकीच्या आरोपांची खातरजमा करण्यासाठी आणि बंदीच्या हालचालींवर कडक लक्ष ठेवण्यासाठी राज्यभर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सीसीटीव्ही बसविल्यामुळे बंदिवानांच्या हालचालींवर जशी नजर ठेवणं शक्य आहे, अगदी तसंच लक्ष प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाºयांवर ठेवण्यात येत आहे. या सीसीटीव्हींमुळे अनेक गैरप्रकारांवर आळा बसविण्यात शासनाला यश मिळाले आहे. तरीही यंत्रणेतील त्रुटी शोधून गैरप्रकार सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा कारागृहातून बाहेर आलेल्या बंदिवानांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयाशेजारी एक आंब्याचे झाड आहे.हे झाड सीसीटीव्हीच्या कार्यकक्षेत येत नसल्याचा शोध काहींनी लावला. त्यानंतर आदेश न ऐकणाºया आणि गैरवर्तन करणाºया पुरुष बंदिवानांना येथे आणून ‘प्रसाद’ देण्यात येतो. महिला बंदींच्या वॉर्डात असणाºया सुभेदार बार्इंना हेड मसाज आणि पाय चेपून घेण्यासाठी वॉर्डचा आडोसाही पुरेसा ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.जिल्हा कारागृहात २ सजा बंदी तर ३०२ कच्चे कैदी आहेत. त्यापैकी १४ बंदिवान महिला आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवायला मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या कॅमेºयाद्वारे अधीक्षकांना अवघ्या कारागृह परिसरावर लक्ष ठेवता येते. विशेष म्हणजे याचे सर्व चित्रण कार्यालयात पाहायला मिळते. पुरुष वॉर्डातील अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेरील आंब्याचे झाड आणि महिला वॉर्डातील आडोसा अनेक घटनांचा, हुंदक्यांचा आणि अश्रूंचा साक्षीदार आहे.अपशब्द बोलणाºयांवर झाली होती कारवाई !विविध कारणांनी कारागृहात आलेल्या बंदिवानांबरोबर बोलण्याची पोलिसांची भाषा अपमानकारक असल्याचा आरोप पाहणी करायला आलेल्या टीमपुढे काही बंदिवानांनी केला. या आरोपांची दखल घेऊन अपशब्द वापरणाºया पोलिसांवर काही महिन्यांपूर्वी कारवाईही करण्यात आली होती.
सातारा जिल्हा कारागृहाचा प्रत्येक भाग सीसीटीव्हीच्या कार्यकक्षेत येईल, अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे; पण एखादं झाड या कमेºयाच्या कक्षेत का येत नाही, हे तपासून पाहावे लागेल. काही बंदिवान स्वत:हून काम करण्याची इच्छा लेखी स्वरुपात व्यक्त करतात. त्यांना काम करण्याची परवानगी दिली जाते, त्याचा भत्ताही त्यांना मिळतो; पण कारागृहात कोणाचीही वैयक्तिक सेवा करणं अपेक्षित नाही. त्यामुळे डोक्याला तेल लावणं किंवा पाय चेपण्याचा संबंध नाही, असे मत कारागृह अधीक्षक गणेश राठोड यांनी व्यक्त केले.