सातारा : येथील महानुभव मठासमोरील दुकानात झालेली चोरी सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली असून, या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संतोष नारायण चव्हाण (वय २०), अजय भानुदास देशमुख (वय २०, रा. मतकर कॉलनी, झोपडपट्टी, सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण आणि देशमुखला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, करंजे येथील महानुभव मठासमोर स्वस्तिक ट्रेडर्स या नावाचे दुकान आहे. या दुकानातून अज्ञात चोरट्याने १६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान, पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता चोरटे कैद झाले होते. एका अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसमवेत ही चोरी केली असल्याचे तपासात समोर आले. ही चोरी झाल्यापासून संबंधित अल्पवयीन मुलगा घरातून गायब झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवारी रात्री तो घरी आल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानुसार टीमने तेथे तत्काळ जाऊन संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देऊन साथीदारांचीही नावे पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी संतोष चव्हाण आणि अजय देशमुख याला अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, हिम्मत दबडे-पाटील, शंकर गायकवाड, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार यांनी केली.
सीसीटीव्हीमुळे दुकानातील चोरी उघडकीस, अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 8:56 PM