सातारा : ‘नगरसेवकाचे रोजच्या रोज दर्शन होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवणे फारसे संयुक्तिक ठरणार नाही. तक्रार सांगणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. तक्रार करा, त्यासाठी फोन करा; पण काम झाल्यावरही नगरसेवकाला कळवा,’ अशी भूमिका प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविकांनी मांडली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभागात वीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव असून, अर्थसंकल्पात त्याचा समावेश होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी नमूद केले.प्रभाग क्रमांक दहाच्या नागरिकांनी रविवारी ‘लोकमत आपल्या प्रभागात’ उपक्रमात खुलेपणाने समस्या मांडल्यानंतर या प्रभागातील नगरसेविका माधुरी भोसले आणि वैशाली राऊत यांनी ‘लोकमत’ कार्यालयात उपस्थित राहून त्यांची भूमिका मांडली. बारटक्के चौकाजवळील खुल्या जागेत झालेली अतिक्रमणे, प्रभागात वाढलेल्या भुरट्या चोऱ्या आणि नागरिकांच्या तक्रारींसंबंधी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘राधिका रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून, त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसते. परंतु संबंधित जागेचा मालक आणि जिल्हा परिषद यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट आहे. याप्रश्नी आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी बोललो आणि तूर्तास सीसीटीव्हीची मागणी केली. किमान वीस सीसीटीव्ही या मार्गावर लावण्याची तरतूद पालिकेच्या अर्थसंकल्पात व्हावी, असा प्रयत्न राहील.’इतर अनेक प्रभागांप्रमाणेच रस्त्यांच्या प्रश्नावर याही प्रभागातील नगरसेविकांचे बोट जीवन प्राधिकरणाकडेच राहिले. ‘रस्ता केलाच तर चांगल्या प्रतीचा केला पाहिजे. परंतु काम होताच पुन्हा प्राधिकरणाकडून खोदला जातो. त्यामुळे कितीही वेळा रस्ता केला तरी टिकणार नाही. अनेक रस्ते मंजूर आहेत; पण प्राधिकरणाचे जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यावरच ते करणे योग्य ठरेल.’ रस्ताप्रश्नी या प्रभागात आणखी एक समस्या असल्याचे नगरसेविकांच्या बोलण्यातून दिसून आले. राधिका रस्ता आणि आसपास शेती आहे. शेतजमीन विकत घेऊन अपार्टमेन्ट्स उभारल्या जातात. इमारतीपर्यंत कच्च्या रस्त्याची सोय बिल्डर करतो; पण नंतर तो रस्ता पालिकेकडे लवकर हस्तांतरित करीत नाही. त्यामुळे डांबरीकरणास विलंब होतो. पालिकेचे मुख्याधिकारी जेथे राहतात त्या अयोध्यानगरीच्या रस्त्यासाठी आपण खुद्द मुख्याधिकाऱ्यांनाच अनेकदा भेटलो होतो; मात्र त्यांनी दरवेळी ‘पैसे नाहीत,’ असे सांगितल्याची तक्रार करतानाच मेपर्यंत हा रस्ता पूर्ण होण्याची ग्वाही त्यांनी दिली.दलितवस्ती विकास निधी या प्रभागाला दोन वर्षे मिळालाच नव्हता; मात्र मिळताच नालंदानगर येथे ओढ्याजवळ संरक्षक भिंत बांधण्यात आली. तेथे साचणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भिंतीलगत भराव टाकण्याचा प्रस्ताव मंजूर असून, येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होईल, अशी माहिती वैशाली राऊत, माधुरी भोसले यांनी दिली. (लोकमत चमू)अस्वच्छतेनेच वाढल्या घुशीप्रभागातील बुधवार पेठेजवळ असणाऱ्या वस्तीत घुशींमुळे घरांना धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता, ‘फेकून दिलेल्या अन्नपदार्थांमुळेच घुशी वाढतात,’ असे सांगून नगरसेविका म्हणाल्या, ‘स्वच्छतेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच; परंतु यंत्रणा अपुरी पडते. नागरिकांनीही स्वच्छतेतील वाटा उचलला पाहिजे. ओला कचरा-सुका कचरा असे वर्गीकरण केले पाहिजे. घंटागाडीचा वापर केला पाहिजे. परंतु रस्त्यातच कचरा टाकण्याची सवय कायम राहिल्यास यंत्रणा किती पुरणार?’ काही महिन्यांपूर्वी ज्या तरुणाला डेंग्यू झाला होता, तो स्वच्छता विभागातील कर्मचारी असल्याचे त्यांनी नमूद केले. डेंग्यूची लागण त्याला इतरत्रही झालेली असू शकते, अशी पुस्ती जोडतानाच सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी, हे त्यांनी मान्य केले. संबंधित वस्तीत पेव्हर ब्लॉकची मागणी आहे; मात्र काँक्रिटीकरणासाठीच प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.दोन टोके जुळविताना...राधिका रस्ता, करंजे, बसाप्पा पेठ या भागात आधुनिकीकरणही झपाट्याने होत आहे आणि शेतीही टिकून आहे. लकडी पुलाकडून येणाऱ्या ओढ्यावर वाटेत छोटे धरण बांधले आहे. या पाण्यावर शेतांत भाजीपाला पिकतो. आता याच भागातील रस्त्यालगत मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. शेतीचे पूर्वीचे पाट बदलले. काही ठिकाणी पाइपलाइन टाकून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी आणि रहिवासी या दोहोंना त्रास होऊ नये अशी रचना करण्याचा प्रयत्न झाला; परंतु हे प्रयोग अयशस्वी झाल्याचे नगरसेविकांबरोबर बोलताना जाणवले. ‘बांधकाम करणाऱ्यांमुळे जमिनीची उंचसखलता बदलली,’ ही बाब मात्र त्यांनी मान्य केली. आता, घरांमध्ये शिरणारे पाणी रोखणे आणि शेती टिकविणाऱ्यांना पाणी देणे अशा दुहेरी जबाबदारीसह पूर आल्यास धोका उद््भवणार नाही यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य नियोजन करण्याचे आव्हान या प्रभागात असणार आहे. डोंगरउतारावर वसलेल्या साताऱ्याचा सर्वांत सखल भाग याच प्रभागात आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.पार्किंगसाठी पैसे का नाहीत?रस्त्यावर भाजी विकणाऱ्याकडून पालिका पावती फाडून पैसे वसूल करते; मात्र शहरातल्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या असतात. तोही रस्ता पालिकेच्याच मालकीचा असल्याने पार्किंग करणाऱ्या कारचालकांची रोजच्या रोज पावती फाडली पाहिजे, अशी कल्पना नगरसेविकांनी बोलून दाखविली.उर्वरित कार्यकालात हे करणार...वैशाली राऊत : इंगवले किराणा दुकान ते लोंढे घर या टापूत अंतर्गत रस्ते, महिला बालकल्याण सभापती असताना प्रस्तावित केलेल्या कामकरी महिला आणि मुलींसाठीच्या १६ खोल्यांच्या होस्टेलच्या कामास गतीमाधुरी भोसले : करंजे येथील शाळा क्र. १७ च्या स्वमालकीच्या इमारतीसाठी प्रयत्न, कण्हेर जलवाहिनीतून करंजेसाठी विभक्त पाणीयोजना, भैरवनाथ ट्रस्टच्या विहिरीचे पुनरुज्जीवन करून हक्काचा स्रोत निर्माण करणे
महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2016 10:58 PM