कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. गावातील मुख्य चौकात हालचालींवर चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जात आहे. या कॅमेऱ्यांच्या ऑपरेटिंगची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून पार पाडली जात आहे.
वीजपुरवठा खंडित
पाटण : कृषी पंपाचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. रात्री-अपरात्री शेतकरी शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी जात असतात. वीज नसल्याने त्यांची निराशा होत आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
पाटण : पाटण ते चाफोली रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाटणच्या पश्चिम बाजूकडे चिपळूण महामार्गापासून चाफोली रस्त्याला सुरुवात होते. सध्या या रस्त्यावरील खड्डे वाहनधारक व प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत.
टेलिफोन सेवा बंद
तांबवे : प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने टेलिफोन वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. सरकारी कार्यालये, शाळा, दवाखाने अशा मोजक्या ठिकाणी टेलिफोनचा वापर अजूनही तग धरून असला तरी ग्रामीण भागात मात्र ही सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. दूरध्वनी सेवेबाबत सध्या कमालीची अनुत्सुकता आहे. सुरुवातीला ही सेवा गावोगावी आणि घराघरांत पोहोचली होती.