औंध : दुष्काळी खटाव तालुक्यातील वरुड येथे बिहार पॅटर्नच्या माध्यमातून गेल्यावर्षी आंब्यांची लागवड करण्यात आली होती. या झाडांची चांगली निगा राखल्यामुळे आमराई चांगली फुलली आहे. या आमराईचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गाव रोलमॉडेल बनविण्याचा संकल्प करण्यात आला.
आंबावृक्ष लागवड वर्षपूर्तीनिमित्ताने साताऱ्याच्या उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांच्यामार्फत लिंबू रोपांचे वाटप करण्यात आले. कुलकर्णी यांनी मियावाकी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, डॉ. महेश बाबर, डॉ. भूषण यादगीरवार, माजी सभापती संदीप मांडवे, आबा लाड, जितेंद्र शिंदे, वरुड गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रांताधिकारी कासार म्हणाले, ‘गावात जेवढी ग्रामदेवतेची मंदिरे महत्त्वाची आहेत. तेवढीच जलमंदिरे महत्त्वाची आहेत. आपण परमेश्वराची सेवा करतोच परंतु झाडांतदेखील देव आहे. त्याचीदेखील सेवा केली पाहिजे. आपल्या सर्व माता-भगिनी वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात. वरुड गावातील तरुणाईने तालुक्यातील सर्व गावांपुढे वृक्ष हाच खरा मित्र असल्याचे दाखवून दिले आहे.’
तहसीलदार किरण जमदाडे म्हणाले, ‘आजची तरुणाई हे सांगत असते की मला समाजमाध्यमांवर एक हजार लाईक्स मिळाल्या. परंतु, वरुड गावचा तरुण सांगतो आहे की माझ्या गावात ११ हजार वृक्षारोपण केले आहे. ह्या खऱ्या लाईक्स आहेत.’
यावेळी संदीप मांडवे, आबा लाड, जितेंद्र शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
चौकट
पाणी फाऊंडेशनच्या गावातून स्फूर्ती
‘आजपर्यंतच्या माझ्या नोकरीच्या काळात मी अनेक गावांना भेट दिली. तिथे कामदेखील केले मात्र पाणी फाऊंडेशनच्या चळवळीत सहभाग घेतलेल्या गावांत एक वेगळी स्फूर्ती मिळते. वरुड गावाने एकजुटीने केलेले हे काम अतिशय सुंदर आहे. वरुड गावाला रोलमॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे मत सातारा उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
फोटो : २० वरुड
वरुड गावातील आमराईचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, जनार्दन कासार, किरण जमदाडे, संदीप मांडवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)