सायगाव : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे,’ या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे सर्व झाडेझुडपे हे आपल्या सामाजिक पर्यावरणाचे घटक आहेत. पर्यावरणात होणारे बदल रोखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या उद्देशानेच जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी तालुक्यात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान एक तरी झाड लावून त्या झाडाला राखी बांधून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.
नैसर्गिक आपत्तीत वाढ, तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ व इतर विपरीत बदल पर्यावरणात घडताना दिसत आहेत. यावर एकच उपाय म्हणजे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा आहे. रक्षाबंधन या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे या सणाचे महत्त्व ओळखून व औचित्य साधून नूतन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी सात आॅगस्टला किमान एक तरी झाड लावून त्या झाडाला राखी बांधून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक यांनी घेऊन रक्षाबंधन साजरा करावा, असे परिपत्रक काढले आहे.
शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे नवनवे उपक्रम या निमित्ताने राबवून तसे राबवल्याचे पंचायत समितीस अवगत करण्याच्या सूचना देखील बुद्धे यांनी केल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक व स्वागत होत आहे. तालुक्यातील शाळा देखील हा उपक्रम राबवण्यासाठी तयारीला लागल्या आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन हे मूल्य समजवणे हा आपल्या मूल्यशिक्षणाचा भाग आहे. त्यादृष्टीने हा अनोखा उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे. त्यानुसार हा उपक्रम सक्तीने राबण्यासंदर्भात शाळांना सूचना देखील केल्या आहेत. - सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी जावळी