वरकुटे-मलवडी : मोहंमद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार इमान, नमाज, रोजा, जकात, हज या पाच कर्तव्यांपैकी 'रोजा' हे पवित्र कर्तव्य मानले जाते. यंदा रमजान महिना कोरोनाच्या वणव्यात आणि भर उन्हाच्या तडाख्यात आल्याने, उपवास करणाऱ्यांंचा चांगलाच कस लागला आहे. तरीही मुस्लिम बांधवांंनी आनंदाने गोरगरीब, गरजू, विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचा मदतरुपी शिधा वाटून रमजान ईदचा सण साजरा केला.
कडक लाॅकडाऊनच्या काळामध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांना काम न मिळाल्याने उपासमार होऊ नये म्हणून घरोघरी जाऊन मुस्लिम बांधवांकडून ईदची ईदी म्हणून अन्नदानरूपी शिदा वाटप करण्यात आला. यावेळी शहाजान मुल्ला, सद्दाम मुल्ला, ईनुस इनामदार, शरपूभाई शेख, हारूण मुल्ला, सिकंदर मुल्ला, शाहरुख मुल्ला, पैगंबर मुजावर, याशिन मुल्ला, खाजू मुल्ला, सलीम मुल्ला, साहिल मुल्ला, रियाज तांबोळी, शकील तांबोळी, मुन्ना इनामदार, अरमान मुल्ला, दादुभाई मुल्ला, फरहान मुल्ला उपस्थित होते.
यंदा कोरोनामुळे मस्जीदमध्ये एकत्रितपणे नमाज न पढता वरकुटे-मलवडीतील मुस्लिम बांधवांनी दररोज घरच्या घरीच नमाज पठण केले. सर्व मुस्लिम बांधवांनी अल्लाह प्रती आपला पवित्र भक्तीभाव व्यक्त करताना, सर्वांची कोरोनाच्या महामारीपासून सुटका व्हावी, अशी भावना व्यक्त करून रमजानचे उपवास सोडले.
कोट :
रमजान सणाचा महिना म्हणजे अल्लाहची उपासना करून मनामध्ये आनंद, आभार मानण्याचा महिना मानला जातो. या महिन्यात दानधर्म करण्यालासुद्धा अधिक महत्त्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे मजुरांना काम-धंदा नसल्याने, हातावर पोट असणाऱ्यांची तारांबळ उडाली असल्याने, गरजूंना मदत देऊन रमजान ईदचा सण साजरा केला.
- शहाजान मुल्ला, वरकुटे-मलवडी