सातारा : कोरोना संसर्गाचे सावट असतानाही दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रोमांच उभा करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि तुता-यांचा आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.आज सकाळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप वनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली. व्यवस्थापक ओंमकार देशपांडे यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सपत्नीक आई भवानीची मनोभावे आरती केली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण कुंभरोशीच्या सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, गट विकास अधिकारी अरुण मरबळ आदी उपस्थित होते.
त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक सुरु झाली. अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले.
यावेळी 'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते ध्वजांचे पुजन करुन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असल्याचे सांगून अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी शिवप्रताप दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.