संडे स्टोरी
सचिन काकडे
मानवी रक्ताला कोणताच पर्याय नाही कारण ते कृत्रिमरित्या तयार करता येत नाही किंवा धान्यासारखे साठवूनही ठेवता येत नाही. आपण जर रक्तदान केले तर कितीतरी जणांचे प्राण वाचू शकतात. हीच गरज ओळखून साताऱ्यात राहणाऱ्या प्रिया व सूर्यकांत अदाटे या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. इतकेच नव्हे तर यापुढे लग्नाचा प्रत्येक वाढदिवस रक्तदानाने साजरा करणार असल्याचा संकल्पही या दाम्पत्याने केला आहे.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने ‘नातं रक्ताचं’ ही राज्यव्यापी रक्तदान मोहीम हाती घेतली आहे. साताऱ्यात शुक्रवारी झालेल्या शिबिरामध्ये अदाटे दाम्पत्याने रक्तदान करून सर्वांपुढे अनोखा आदर्श ठेवला. सूर्यकांत अदाटे हे देऊर (ता. कोरेगाव) येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेल्या अकरा वर्षांपासून कार्यरत आहेत तर त्यांची पत्नी प्रिया अदाटे यादेखील उच्चशिक्षित आहेत. पूर्वीपासूनच त्यांनी कला, सांस्कृतिक व सामाजिक कार्याची आवड जोपासली आहे. वेगवेगळे चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत अदाटे यांनी निवेदिका म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे.
अदाटे दाम्पत्याच्या लग्नाला शुक्रवारी पंधरा वर्षे पूर्ण झाली. या दाम्पत्याने यंदाचा वाढदिवस ‘लोकमत’च्या ‘नातं रक्ताचं’ मोहिमेत सहभाग घेऊन साजरा केला. सध्या कोरोना संक्रमणाचा काळ सुरू आहे. कोरोनाबरोबरच इतर आजारातील रुग्णांना देखील रक्ताची कमतरता भासू लागली आहे. ही गरज ओळखून अदाटे दाम्पत्याने रक्तदान तर केलेच शिवाय यापुढे लग्नाचा प्रत्येक वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याचा संकल्पही केला.
सूर्यकांत अदाटे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, पत्नी प्रिया यांचा २०१० रोजी अपघात झाला होता. यावेळी त्यांना रक्ताची गरज भासली होती. रक्ताची शोधाशोध करताना आम्हाला प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. तेव्हाच रक्ताचे महत्त्व आणि गरज आम्हाला कळाली. तेव्हापासूनच आम्ही आपत्कालिन प्रसंगी व वर्षातून दोन ते तीनवेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला. समाजातील इतर नागरिकांनीदेखील रक्ताचे महत्त्व जाणावे व रक्तदान मोहिमेला अधिक बळकटी द्यावी, एवढीच आमची अपेक्षा आहे.
(चौकट)
सलग दहावेळा रक्तदान
नगराध्यक्ष माधवी कदम यांचे स्वीय सहाय्यक अतुल दिसले यांनीदेखील रक्तदानाची परंपरा सुरू ठेवली आहे. ‘लोकमत’च्या ‘नातं रक्ताचं’ मोहिमेत रक्तदान करून त्यांनी रक्तदानाचे दशक पूर्ण केले. याहीपुढे आपण कायम रक्तदान करणार असल्याचे ते म्हणाले.
फोटो मेल