सातारा : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला व पुरुषांनी रांगा लावून दर्शन घेतले. महाशिवरात्र निमित्त शहरातील कोटेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. महिला व पुरुषांना दर्शन घेता यावे, यासाठी वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या होत्या. दर वर्षी शहरातील कोटेश्वर मंदिर, गुरूवार पेठ, यादोगोपाळ पेठ येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फलटण, शिरवळ, खंडाळा, कोरेगाव, वाई, महाबळेश्वरमध्येही महाशिवरात्रनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणीही भाविकांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. बामणोली शिवसागर जलाशयापलीकडे रत्नागिरीच्या हद्दीवर नागेश्वर या जिल्ह्यातील सर्वात उंच पर्वत शिखरावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोयना अभयारण्याचे घनदाट जंगल व सरळ उंच डोंगर, घसरड्या पाऊल वाटा अशा चित्तथरारक गिर्यारोहणाचा अनुभव घेत हजारो शिवभक्त नागेश्वरला पोहोचले. भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून तापोळा येथून बोटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात महाशिवरात्र उत्साहात साजरी
By admin | Published: February 18, 2015 1:01 AM