कऱ्हाड : शेरे, ता. कऱ्हाड येथील गोरक्षनाथ मठात योगी जगन्नाथ बाबाजी यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त सकाळी अभिषेक तसेच पूजा पार पडली. त्यानंतर भजन आणि फुले टाकण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हालगा-बेळगाव येथील गोपालनाथ बाबाजी उपस्थित होते. आरतीनंतर गोपालनाथ बाबाजी यांचा दर्शन सोहळा झाला. योगी फुलनाथजी यांनी स्वागत केले. या सोहळ्यास सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील भक्त उपस्थित होते. गोरक्षनाथ मठ भक्त मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
एसएमएस स्कूलमध्ये कार्यशाळा उत्साहात
कऱ्हाड : येथील एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राथमिक विभागातून ऑनलाइन माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा, यासाठी एसएमएसच्या प्राथमिक विभागाने ऑनलाईन माध्यमातून ही कार्यशाळा आयोजित केली होती. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव दिला. कार्यशाळेस शिक्षिका वाळिंबे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पखवाज वादन स्पर्धेत संचिता शीलवंत प्रथम
कऱ्हाड : तालमंथन पखवाज सोलो वादन प्रकारात सूर्यवंशीवाडी, ता. पाटण येथील संचिता शीलवंत हिने प्रथम तर सिद्धार्थ माने याने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जय सुतार, साहिल गुरव आणि संघमित्रा शीलवंत यांनीही यश मिळवले. भजनसम्राट किरण भोसले, तबला विशारद चंद्रकांत सप्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सहभागी स्पर्धकांना परीक्षकांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मोरगिरी, पाटण, मरळी, बेलवडे, नवारस्ता, मल्हारपेठ, उरुल विभागातील स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेसाठी आनंदराव देसाई, विजय रामिष्टे, अनिल पाटील, संजय कवर, पप्पू महाराज नाडेकर आदी उपस्थित होते.
‘एसजीएम’मध्ये वूमेन्स मिलिटरी अकॅडमी
कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात रयत शिक्षण संस्था आणि विजय दिवस समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वुमेन्स मिलिटरी अकॅडमीचे उद्घाटन आणि सैन्यदलात महिलांसाठी करिअरची संधी या विषयावर मार्गदर्शन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन सत्यजित पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते. यावेळी विलास जाधव उपस्थित होते. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये महिलांना अधिकारी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्यासाठी युवतींनी कष्ट घेण्याची गरज असून प्रयत्न केल्यास या क्षेत्रात यश मिळेल, असे मत यावेळी सत्यजित पाटील यांनी व्यक्त केले. विद्या पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रा. नेताजी सूर्यवंशी, आर. वाय. पाटील उपस्थित होते. प्रा. सचिन चव्हाण यांनी आभार मानले.