कऱ्हाड : येथील शिवाजी विद्यालयात गुरुपौर्णिमा ऑनलाइन पद्धतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक पी.बी. साळुंखे यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ‘गुरुपौर्णिमा’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशनही मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. प्रांजली पाटील, सिद्धी कदम या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. बी.आर. यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्ही.आर. देसाई, व्ही.आर. पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. बी.वाय. मुजावर यांनी आभार मानले.
धायटीतील पूल वाहतुकीसाठी खुला
कऱ्हाड : पाटण तालुक्यातील चाफळसह परिसरात चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने धायटीनजीकचा फरशी पूल पाण्याखाली गेला होता. तसेच पुलाच्या पाइपमध्ये डोंगराचा काही भाग कोसळून पाण्याबरोबर वाहून गेला. फरशी पुलावरून पाणी वाहू लागल्याने सात वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला होता. याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना मिळताच त्यांनी यंत्रणा कार्यान्वित करून पूल वाहतुकीसाठी सुरळीत केला असून, या पुलावरून पूर्ववत वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन
कऱ्हाड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती कऱ्हाड तालुक्याच्या वतीने १ ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती शहरातील बुधवार पेठेत असणाऱ्या महात्मा फुले चौकात साधेपणाने साजरी करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव हरिभाऊ बल्लाळ यांनी पत्रकाद्वारे दिली. समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस रामभाऊ दाभाडे, संजय तडाखे, समितीचे माजी अध्यक्ष अमोल साठे, रमेश सातपुते, गजानन सकट, विवेक भोसले, राहुल वायदंडे, देवानंद कांबळे आदी उपस्थित होते.
माजगावात बिबट्याचा श्वानावर हल्ला
कऱ्हाड : माजगाव, ता. पाटण येथील भरवस्तीत असलेल्या धनाजी काटकर यांच्या श्वानावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पडला. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. उत्तरमांड धरण झाल्यामुळे माजगावमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे अनेक जंगली प्राणी डोंगरात न राहता उसाच्या क्षेत्रात वावरत आहेत. भरदिवसाही अनेक वन्यप्राणी परिसरातील रस्त्यावर व शेतात ग्रामस्थांना दिसून येतात. बिबट्यानेही परिसरात अनेकवेळा हल्ला करून पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे.