सातारा - जेलच्या भिंतीवरून आत मोबाईल टाकून त्याचा कैदी सर्रास वापर करत असल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्हा कारागृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कैद्याकडून मोबाईल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातारा जिल्हा कारागृहाच्या शौचालयामध्ये कैदी संजय नामदेव जाधव (वय ३९, रा. पिंपळवाडी, पो. धावडशी, ता. सातारा) हा खाली बसून मोबाईलवर बोलत असताना कारागृह पोलीस कर्मचा-याने त्याला पकडले. याबाबत माहिती अशी की, दत्तात्रय ज्ञानदेव चव्हाण (४८, कारागृह पोलीस कर्मचारी) यांनी कारागृहातील सर्व कैद्यांना सकाळी साडेसहा वाजता खुले केले. त्यानंतर सकाळी दहा वाजता सर्कल नंबर दोनच्या पाठीमागील शौचालयातील शेवटच्या शौचालयामध्ये दोघेजण बोलत असल्याचा आवाज येत होता. म्हणून चव्हाण त्याठिकाणी पाहण्यासाठी गेले असता संजय जाधव हा खाली बसून मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून मोबाईल ताब्यात घेऊनसुभेदार व कारागृह अधीक्षकांसमोर चौकशी केली असता त्याने ‘चार दिवसांपूर्वी त्याचा मुलगा मुलाखतीस आला होता. त्यावेळी त्याला मोबाईल जेलच्या बाहेरील भिंतीवरून आत टाक, असे सांगितले. त्याप्रमाणे मुलाने मोबाईल जेलमध्ये टाकला. तो मोबाईल घेऊन त्याचा वापर करीत होता,’ अशी कबुली दिली. यावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.