उंब्रज : उद्योजक मुल्लाबंधू यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यामुळे सुमारे पंधरा वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे घडलेल्या घटनेला उजाळा मिळाला. महामार्गालगत असणाºया उंब्रजचे झपाट्याने विस्तारीकरण होत असून, उंब्रज हे जणू काय दरोड्याचे केंद्रबिंदू ठरतेय, असेच वाटू लागले आहे. त्यावेळचा दरोडाही आता पोलिसांच्या विस्मृतीत गेला आहे.येथील उद्योजक मुल्लाबंधू यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकून त्यांच्या वृद्ध आर्इंचा खून केला. आणि सोन्याची लूट केली. त्यामुळे या धक्क्यामधून उंब्रजकर अद्याप सावरले नाहीत. या धाडसी दरोड्याच्या निमित्ताने पंधरा वर्षांपूर्वी पडलेल्या दरोड्याची चर्चा आता उंब्रजमध्ये होऊ लागली आहे.
उद्योजक राजेंद्र घुटे यांच्या ‘ऋतुगंध’ या बंगल्यावर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दरोडा पडला होता. त्यावेळी बंगल्यात शर्मिला घुटे आणि त्याचा मुलगा विक्रांत हे दोघेच बंगल्यात होते. राजेंद्र घुटे कामानिमित्ताने परगावी गेले होते. दरोडेखोरांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केल्यानंतर त्यांना वॉचमन कदम यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुमारे १५ दरोडेखोरांनी त्यांना लोखंडी गजाने निर्घृणपणे मारहाण करून त्यांचा खून केला होता. या मारहाणीत कदम यांनी आरडाओरडा केल्यामुळे बंगल्यात असलेल्या शर्मिला घुटे या जाग्या झाल्या. त्यांनी गॅलरीत येऊन प्रकार पाहिला आणि बंगल्यावर असलेला सायरन सुरू केला.
मुलगा विक्रांत याला बरोबर घेतले. त्यांच्या पेट्रोल पंपावर फोन करून कर्मचाºयांना कल्पना दिली. त्याचवेळी दरोडेखोरांनी मुख्य दरवाजा तोडला. यानंतर मात्र शर्मिला घुटे यांच्यापुढे कोणताच पर्याय नव्हता. त्यांनी स्वत:कडील पिस्टल घेतली आणि थेट गोळीबार केला. गोळीचा आवाज, सायरनचा आवाज आणि जमा होऊ लागलेले लोक पाहून बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोरांनी तेथून पळ काढावा लागला होता.यानंतर दहा दिवसांच्या आत घुटे यांच्या नितिराज पेट्रोलपंपावरही दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी पेट्रोलपंपावरील कर्मचाºयांना प्रसाद म्हणून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि पंपात रोख रक्कम असलेली लोखंडी तिजोरी गॅसकटरने कापण्याचा प्रयत्न केला; पण ती तिजोरी कापली गेली नाही.बंगल्यामध्ये हायटेक सुरक्षा..दरोड्याच्या घटनेनंतर मात्र उद्योजक राजेंद्र्र घुटे यांनी बंगल्यात हायटेक सुरक्षा यंत्रणा उभी केली. बंगल्याचा मुख्य दरवाजा तुटणार नाही, अशा पद्धतीने विविध धातूंच्या मिश्रणातून तयार करून घेतला. सर्व दरवाजे, खिडक्यांना डबल ग्रील बसवले. तसेच बंगल्याच्या भोवतालच्या संरक्षण भिंतींना लेजर सिक्युरिटी सिस्टीम बसवली. या सिस्टीममुळे या परिसरातही कोणीही आले तरी बंगल्यातील अलार्म वाजतो आणि ते ठिकाणही बंगल्यातील व्यक्तीला दिसते. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वत:ची वॉकिटॉकी यंत्रणाही तयार केली आहे.वॉचमन नेमलेले आहेत. यातील लेजर सिक्युरिटी सिस्टीममुळे त्यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी केलेला दुसरा प्रयत्न निष्फळ ठरला होता. दरोडेखोर संरक्षण भिंतीवरून बंगल्याच्या आवारात येत असतानाच या सिस्टीममुळे घुटे यांना दरोडेखोराचा सुगावा लागला आणि ठिकाण समजले. तेव्हा त्यांनी बाथरूमच्या खिडकीतून दरोडेखोरांच्यावर स्वत:कडील रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला होता. तेव्हा ते दरोडेखोर पळून गेले होते.