सातारा : केंद्रीय पथकाने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला उपयुक्त अशा सूचना केल्या. या केंद्रीय पथकामध्ये डॉ. गिरीश व डॉ. प्रीतम महाजन होते.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरीची संख्या वाढवावी तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती जनतेला व्हावी यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पिटलच्या बाहेर बेड उपलब्धतेची माहिती रोजच्या रोज अपडेट करावी. जो भाग कंटेन्मेंट जाहीर केला आहे, अशा भागात केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रभावी अंमलबजावणी करावी. कोरोना संसर्ग रुग्णाच्या जे जे संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांची तातडीने कोरोना टेस्टिंग करावी यासह विविध सूचना केंद्रीय पथकातील डॉ. गिरीश व डॉ. प्रीतम महाजन यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन सुविधा वाढविण्यावर भर देत असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली.