सातारा : अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या पाटण तालुक्यातील ढोकावळे या गावाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट दिली. सुमारे पाच किलोमीटर पायपीट करून त्यांनी तेथील परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला. तसेच दुर्घटनाग्रस्त लोकांशी चर्चा करून प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.
पाटण तालुक्यातील खालचे आंबेघर येथे भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली घरे गेली आहेत. तसेच काही लोक बेपत्ता झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी या गावाला भेट दिली. तर जवळपास पाच किलोमीटर पायपीट करून रिसवड येथून ढोकावळे येथेही जाऊन पाहणी केली. नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. जास्तीत जास्त मदत देण्याची त्यांनी ग्वाही दिली. तसेच शासनाकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
पूरग्रस्तांची तात्पुरती सोय मनेरी चाफेर या ठिकाणच्या माध्यमिक शाळेत करण्यात आली आहे. त्या ठिकाणीही त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वृद्ध तसेच लहान मुले आणि जखमी नागरिक यांची भेट घेतली व आस्थेने विचारपूस केली. तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन जखमी नागरिकांना लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्याची सोय केली. जवळपास १५० दुर्घटनाग्रस्त नागरिकांना भोजनाचे साहित्य पुरविण्यासाठी तातडीने कार्यवाही केली. मिरगाव चाफेर येथील माध्यमिक शाळेमध्ये उर्वरित नागरिकांना तातडीने हलविण्यात आले. त्यांना अन्न, ब्लँकेट आणि बेडशीट पुरविण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कार्यकारी अभियंता खैरमोडे, उपअभियंता आर. एस. भंडारे, सांख्यिकी विस्तार अधिकारी सागर बोलके आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनीही चाफेर येथील हायस्कूलमध्ये भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
फोटो दि.२५सातारा झेडपी...
फोटो ओळ : पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन माहिती घेतली.
..............................................................