लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील किती ज्ञात प्राप्त होते, हे पाहण्यासाठी असलेल्या परीक्षा यंदा रद्द करण्यात आल्या. दहावीची परीक्षाही रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या ज्ञानाचा स्तर काय, याची माहिती होण्यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाल्याने याद्वारे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून कोविडने थैमान घातल्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यातच विद्यार्थ्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुलांनी ऑनलाइन अभ्यास केला असला तरीही त्यांना त्यातील किती ज्ञान मिळाले, हे पाहण्यासाठी परीक्षा हे एकमेव मापदंड होते. मात्र, दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता वाढल्याने शासनाने दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतला.
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल कसा जाहीर करायचा, अकरावी प्रवेश कसे करायचे, आदी प्रश्न अनेकांना पडले होते. शिक्षण विभागाने सीईटीच्या परीक्षेसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी सकारात्मक कौल दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणते विषय निवडावेत, यासह कमी आकलन झालेल्या विषयाकडे पुन्हा एकदा लक्ष देणे शक्य होणार आहे.
सीईटी तरी घेणार कशी?
कोरोना महामरीच्या काळात परीक्षेचे आयोजन कसे करावे, हा प्रश्न प्रशासनासमोर असणार आहे. याबरोबरच सीईटी किती गुणांची घ्यायची, त्यात कोणत्या विषयांचा समावेश करायचा, बहुपर्यायी प्रश्नांसाठी पुन्हा नव्याने प्रश्नपत्रिका काढणे या सर्वच बाजूंनी हा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे सीईटी घ्यावी, या बाजूने कौल दिला गेला असला तरीही त्याच्या अंमलबजावणीवरही बारकाईने काम करण्याची गरज आहे.
कोट :
दहावीची परीक्षा यंदा झाली असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अकरावीत कोणत्या शाखेत प्रवेश द्यावा, याबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्वच विषय समाविष्ट असलेली सीईटी घ्यायला काहीच हरकत नाही. शाळा त्यादृष्टीनेही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेऊ शकेल.
- मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस
मुलांचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे सीईटीचा पर्याय उपयुक्त ठरेल. नवीन शिक्षण धोरणात बारावीला महत्त्व दिले आहे. त्यामुळे जी मुले दहावीत ज्या शाळेत होते, त्याच शाळेत राहतील, शाळांना अकरावीच्या तुकड्या द्याव्यात. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचाही प्रश्न निकाली निघेल.
- राजेंद्र चारेगे, गुjुकुल स्कूल
शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक विद्यार्थ्यांना आपले मत नोंदवता आले नाही. विषय फक़्त अकरावी प्रवेशाचा नसून पॉलिटेक्निकचे, आयटीआय या प्रवेशासाठीही पर्याय शोधणे आवश्यक आहे. सीईटी ऑफलाइन घेतली म्हणजे पुन्हा परीक्षेसाठीची यंत्रणा राबविणे आले, कोविड काळात हे जमणे शक्य वाटत नाही.
- अमित कुलकर्णी, विद्यापीठ काउन्सिल सदस्य
अंतर्गत मूल्यमापन कसे करणार?
प्रत्येक विद्यार्थ्याची आवड आणि शैक्षणिक कल वेगवेगळा असतो. त्यामुळे दहावीनंतर त्यांनी कुठे प्रवेश घ्यायचा, याची थोडक्यात कल्पना प्राप्त गुणांमधून येऊ शकते. शास्त्र शाखेत जाणाऱ्याला विज्ञान आणि गणिताची गती अपेक्षित असते. सरसकट मूल्यमापन झाल्यामुळे विद्यार्थ्याला कुठे जायचे आहे? कशात गती आहे? हेच समजायला मार्ग शिल्लक राहणार नाही. परिणामी, मित्र-मैत्रिणींच्या प्रभावाखाली भलत्याच शाखेत प्रवेश घेऊन शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.