चचेगाव परिसरातील शेतात गत काही दिवसांपासून मेंढपाळांचे वास्तव्य आहे. दिवसा हे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी मोकळ्या रानात घेऊन जातात. रविवारी सकाळी मेंढपाळ चचेगाव येथील स्मशानभूमीपासून जवळच असलेल्या काळा डोह परिसरात नदीकाठी मळीत मेढ्यांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शांतता असताना नदीच्या पाण्यात आवाज झाल्याने मेंढपाळाने आवाजाच्या दिशेने पाहिले असता पाण्यात त्यांना महाकाय मगर दिसून आली. तातडीने त्यांनी शेतकरी, इतर सहकाऱ्यांसह ग्रामस्थांना तेथे बोलावले. बराच वेळ तेथे नदीपात्रात मगर होती. मेंढपाळांनी त्या मगरीचे मोबाइलमधे फोटो काढले. आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.
कोयना नदीपात्रालगत शेतीला व गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांचे पंप हाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार नदीपात्राकडे जावे लागते. अचानक या भागात मगर प्रकटल्याने सर्वजण धास्तावले आहेत. साधारणत: १० फूट लांबीची मगर आढळून आल्याने शेतीची कामे करणारांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या वर्षांत पहिल्यांदाच याठिकाणी मगर दिसल्याने कोयना नदीपात्रात मगरीचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित होत आहे. या परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी कुणी उतरू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
- चौकट
चचेगावात मगर आली कोठून
गोड्या पाण्यातील मगर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात पाण्याबाहेर येऊन अंडी घालते. साधारणपणे एकावेळी २० ते २५ अंडी मगर देते. यामुळे या मगरीने या भागात अंडी घातली असावीत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, चचेगाव परिसरात ही मगर कोठून आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- चौकट
तीन ते चार किलोमीटरमध्ये वावर
मगर भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत शेड्युल्ड १ मधील प्राणी आहे. नदी, तलाव, धरण अशा नैसर्गिक अधिवासात असेल तर ती पकडता येत नाही. पाण्याबाहेर शेतात, विहिरीत, ओढ्यात किंवा नाल्यात असेल तर रेस्क्यू करता येते. मात्र, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर कार्यालयाच्या परवानगीशिवाय रेस्क्यू करता येत नाही. मगर डोहात वास्तव्य करते. ऊन घेण्यासाठी पाण्याच्या वरती दिसते. मानवाचा वावर असेल तर त्या ठिकाणाहून २ ते ३ दिवसांत ती निघून जाते. मगर पाण्यात ३ ते ४ किलोमीटर फिरते, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
फोटो : १९केआरडी०६
कॅप्शन : चचेगाव, ता. कऱ्हाड येथे कोयना नदीपात्रात आढळलेल्या मगरीचे मेंढपाळांनी मोबाइलमध्ये छायाचित्रण केले.