दरम्यान, गावात भयावह परिस्थिती असताना, गावचे लोकनियुक्त सरपंच सूर्यकांत पाटील हे रजा घेऊन पुण्याला गेल्याचे ग्रामसेवक राजेंद्र चोरगे सांगत आहेत. ग्रामसेवकही दोन दिवसांपासून निवडणूक ड्युटीवर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कर्तव्यापासून दूर पळणाऱ्या विद्यमान सरपंचांनी साथीची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चाफळ येथे चार दिवसांपूर्वी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला गळती लागली होती. त्यामुळे दोन दिवस गावात पाणी पुरवठा बंद होता. गळती काढल्यानंतर गावाला पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यायला हवी होती. मात्र, ती न घेतल्याने संपूर्ण गावाला दूषित पाण्याचा पुरवठा झाला. परिणामी, गावात मोठ्या प्रमाणात अतिसाराची साथ पसरली. साथीच्या पहिल्या दिवशी एकूण ३० जणांना उलट्यांसह जुलाबाचा त्रास झाला. दुसऱ्या दिवशी १४, तर तिसऱ्या दिवशी नव्याने ५० रुग्णांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा ९४ वर पोहोचला आहे.
गावात साथीचा फैलाव झाल्याचे समजताच आरोग्य विभागाने सर्व्हे करत ठिकठिकाणी गळती असणाऱ्या पाईपलाईन शोधत त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच पाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या सूचना डॉ. सचिन कुराडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या. तसेच दुसरीकडे गावावर एवढी गंभीर परिस्थिती ओढवलेली असताना, सरपंच सूर्यकांत पाटील हे रजा घेऊन पुण्याला गेल्याचे ग्रामसेवक राजेंद्र चोरगे यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
- चौकट
पाईपलाईनची गळती काढण्यास सुरूवात
सरपंच गावात नसल्याने माजी उपसरपंच उमेश पवार, सदस्य अशिष पवार यांनी पुढाकार घेत, गळती लागलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभागाने ठोस पावले उचलत रुग्णांचा शोध घेत रुग्णालयांत दाखल रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले आहेत.
- कोट
ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे आमच्या मुलाबाळांवर वाईट वेळ आली आहे. गावाने निवडून देऊनही सरपंच अडचणीच्यावेळी रजा टाकून परगावी निघून गेले. कोरोना काळातही त्यांनी रजा टाकली होती. माझ्या मुलीसह अनेकजण कऱ्हाडला खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
- अमोल दबडे
ग्रामस्थ, चाफळ
- कोट
गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. संपूर्ण विहिरीतील पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. मी पुण्याहून चाफळला यायला निघालोय. सध्या गावामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. उपाययोजना सुरू आहेत. लवकरच साथ आटोक्यात येईल.
- सूर्यकांत पाटील, सरपंच
फोटो : १८केआरडी०१
कॅप्शन :
चाफळ, ता. पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी डॉ. सचिन कुराडे यांच्याशी चर्चा केली.