चाफळ : येथील तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरासह संपूर्ण चाफळ गावाला वीजपुरवठा करणारी मुख्य विद्युत पेटी उत्तरमांड नदीपात्रात धोकादायक स्थितीत आहे. या विद्युत पेटीला पाण्याचा विळखा पडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. परिणामी संपूर्ण चाफळ गावाला अंधारात बसावे लागत आहे. वीजपेटी सुरक्षित ठिकाणी बसवण्याची मागणी होत आहे.प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या चाफळ येथील मंदिरात व संपूर्ण चाफळ गावाला वीजपुरवठा करणारी विद्युत पेटी उत्तरमांड नदीच्या बाजूला बसवण्यात आली होती. परंतु सध्या नदीचे पात्र दोन्हीं बाजूकडे सरकू लागल्याने ही पेटी पात्रात येऊ लागली आहे. पावसाळ्यात नदीला महापूर येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यादरम्यान ही विद्युत पेटी पूर्णत: पाण्यात जाते. आणि वीजपुरवठा खंडित होतो.
परिणामी संपूर्ण चाफळ गावाला अंधारात बसावे लागते. याबाबत गतवर्षी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पेटी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची ग्वाही वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, अद्याप ही पेटी नदीपात्रातून हटवली नाही. सध्या या पेटीभोवती मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पेटीत बिघाड झाल्यास याच झाडीतून वाट काढून दुरुस्ती काढावी लागत आहे. यावर्षीही चाफळ गावाला अंधारात बसावे लागणार आहे.सरपंच सूर्यकांत पाटील व सदस्य यांनी वीज कंपनीस कागदपत्रांची पूर्तता करून वीजपेटी सुरक्षित ठिकाणी उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.