चाफळ : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवस संचारबंदी लागू केली असून त्याला चाफळ परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे होणारी हानी टाळण्यासाठी तसेच संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. चाफळ तसेच विभागातील सर्व खासगी कार्यालये, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, हाॅटेल्स, खासगी वाहतूक व्यवस्था, दुचाकी वाहने आदींनी संचारबंदी मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. नेहमी गजबजलेली चाफळ बाजारपेठ तसेच एसटी बसस्थानक ग्रामपंचायत कार्यालय परिसरात शुकशुकाट जाणवत होता.
दरम्यान, चाफळ बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल्स सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवस आगोदरच गरजेच्या वस्तूंचा साठा नागरिकांनी केल्याचे दिसून येत होते.
यावेळी उंब्रज पोलीस स्टेशचे सपोनि अजय गोरड यांनी स्वयंस्फूर्तीने संचारबंदीमध्ये जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास चाफळसह परिसरातील ग्रामस्थांनी तसेच चाफळ येथील व्यापारी वर्गाने अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवून सहभाग नोंदवला. दरम्यान, शासनाच्या वतीने संचारबंदीच्या काळात कामा व्यतिरिक्त कोणीही विनाकारण घराबाहेर पडून नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. तरीही, काही जण विनाकारण दुचाकी वरून फिरताना पोलिसांना आढळून आले त्यांच्यावर चाफळ पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक अमृत आळंदे, सुशांत शिंदे, होमगार्ड संभाजी हिंमणे यांनी नाकेबंदी करून कारवाई करून दंड वसूल केला.