सातारा : दुकानात घुसून वृद्धाची मान दाबून अडीच तोळ्यांची चेन लांबविल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजता मंगळवार पेठेत घडली.याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश गेणू सोळसकर (वय ६७, रा. मंगळवार पेठ सातारा) यांचे मंगळवार पेठेत किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी सकाळी ते दुकानात बसले होते. त्यावेळी दोन युवक च्युर्इंगम व विक्सच्या गोळ्या घेण्याच्या बहाण्याने दुकानात आले.
सोळसकर यांना काही कळायच्या आत संबंधित दोघा चोरट्यांनी त्यांची मान खालू दाबून त्यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजारांची अडीच तोळ्यांची चेन हिसकावून नेली. त्यानंतर दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
या प्रकारानंतर सोळसकर यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे दिसेनासे झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.