आॅनलाईन लोकमतनितीन काळेल/ सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड झाल्याने आता विषय समितींच्या सभापतिपदावर आपली वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांत चढाओढ सुरू झाली आहे. त्यातच अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत डावललेल्यांना या पदात संधी मिळण्याची शक्यता आहे. आता दोन मतदार संघाला न्याय मिळाल्याने पाटण, कोरेगाव, माण, वाई, कऱ्हाड उत्तर या मतदार संघांमध्ये चार सभापतिपदे जाणार, हे निश्चित आहे.
दरम्यान, पाटणच्या राजेश पवारांना शिक्षण समिती सभापतिपद निश्चित झाले आहे. नाराज मानसिंगराव जगदाळेंची सभापतिपद घेण्याची भूमिका काय राहणार हेही महत्त्वाचे राहणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ सदस्य आहेत. तर एका अपक्षाचा पाठिंबा मिळून ४० जणांचे बहुमत आहे. त्यामुळे ६४ सदस्य असणाऱ्या जिल्हा परिषदेत विरोधकांचा विरोध तोकडा पडणारा आहे. त्यातच काँग्रेस, शिवसेना, भाजप एकत्र येऊनही राष्ट्रवादीला शह बसणार नाही. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी या निर्विघ्नपणे पार पडल्या. काय रुसवा, फुगवा होता तो राष्ट्रवादीअंतर्गतच झाला. आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी झाल्याने चार विषय समितींची सभापतिपदे कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा आणि फलटण मतदार संघात दोन पदे गेल्याने येथील लोकप्रतिनिधींचा सभापतिपदावरील दावा संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता इतर मतदार संघात चार समित्यांची सभापतिपदे द्यावी लागणार आहेत. पाटणमधील राजेश पवार यांचे उपाध्यक्षपदासाठी नाव बारामतीकरांनी अंतिम केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यावर पाणी पडले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आक्रमकतेमुळे शेवटी उपाध्यक्षपद सातारा मतदार संघातील वसंतराव मानकुमरेंना मिळाले. त्यामुळे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे नाराज झाले. त्यावेळी राजेश पवार यांना शिक्षण समिती सभापतिपद देण्याचे निश्चित करण्यात आले. पाटणचा विषय संपल्याने इतर मतदार संघात कोणकोणती पदे जाणार याबाबत राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. तसेच अनेक इच्छुकांनी मोचेर्बांधणी सुरू केली आहे. चार समित्यांपैकी एकतर पद आपल्याला मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदासाठी मानसिंगराव जगदाळे यांच्या नावाची चर्चा होती. कऱ्हाड उत्तरच्या आमदारांनीही अध्यक्षपदावर कऱ्हाडचा दावा आहे, असे ठामपणे सांगितले होते. पण, या निवडीत जगदाळेंना बाजूला ठेवण्यात आले. जगदाळे तसेच कऱ्हाड उत्तरचे आमदार ही नाराज आहेत. त्यामुळे कृषी सभापती पद मानसिंगराव जगदाळे यांना मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा पुढील अडीच वर्षांनंतर ते उपाध्यक्ष होऊ शकतात. कोरेगाव मतदार संघातील प्रदीप विधाते किंवा जयवंत भोसले या दोघांपैकी एकाला सभापती मिळण्याचे निश्चित आहे. आमदार शशिकांत शिंदे हेच याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात. वाई मतदार संघासाठीही आमदार मकरंद पाटील आग्रही राहू शकतात. एक सभापतिपद वाई मतदार संघात असणारच, असे आमदार मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. शेखर गोरेंचा आग्रह राहणार...माण मतदार संघात आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे शेखर गोरे हे मतदार संघापेक्षा माण तालुक्यात सभापतिपद मिळविण्यासाठी आग्रही आहेत. महिला व बाल कल्याण समितीचे पद माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांच्या सुनेला मिळू शकते. कऱ्हाड दक्षिण मतदार संघात पद मिळण्याची शक्यता कमी आहे.