सातारा : बोरगावमध्ये उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री आठ वाजता दारूची बाटली फोडणाऱ्या विशाल प्रल्हाद शितोळे (वय २२, रा. आंबेवाडी, ता. सातारा) याला मनाई केल्याच्या रागातून त्याने चौघांवर चाकूहल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पुणे-बेंगलोर महामार्गावर बोरगाव, ता. सातारा येथील उड्डाणपुलाखाली काही लोक गप्पा मारत बसले होते. दरम्यान, विशाल शितोळे हा दुचाकीवर त्याठिकाणी आला. तो स्वत:कडील दारूची बाटली त्याठिकाणी फोडत होता. त्यावेळी विजय साळुंखे, दीपक साळुंखे, अनिल साळुंखे व उत्तम माळवे (सर्व रा. बोरगाव) यांनी हटकले. याचा राग मनात धरून विशाल चौघांशी बाचाबाची करू लागला. त्यानंतर संतापलेल्या विशालने स्वत:कडील चाकूने विजय साळुंखे यांच्या पाठीत वार केला. तर इतरांच्या हात व पायावर वार केला. यात ते चौघेही जखमी झाले. त्यानंतर तातडीने चौघांना रुग्णालयात दाखल केले असता विजय साळुंखे यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून आरोपी विशाल शितोळे याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करून शितोळे याला अटक केली. पोलीस तपासात त्याने बाटली फोडत असताना चौघांनी विरोध केल्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. दरम्यान, विशालला न्यायालयात दाखल केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.