लोकमत न्यूज नेटवर्क
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आत्तापर्यंत दिवंगत विलासराव पाटील उंडाळकरांनी कधी भोसलेंना तर कधी मोहित्यांना जवळ करत विधानसभेच्या निवडणुकीत त्रास होणार नाही अशीच राजकीय गणितं जुळवली होती. जे आपल्याला सहकार्य करतील त्यांना साथ देण्याची भूमिका त्यांनी नेहमीच घेतली. त्यामुळे मागील काही निवडणुकांचा इतिहास पाहता जिकडे काका तिकडे गुलाल असे समीकरण बनले होते. मात्र, या निवडणुकीत काकांच्या पश्चात हे समीकरण राखण्यात नवी पिढी यशस्वी होणार का? असा सवाल करत कार्यकर्त्यांसह सभासद वेट अँड वॉचवर आहेत.
कृष्णा कारखान्याची निर्मिती केल्यापासून दिवंगत जयवंतराव भोसले यांच्याकडे कारखान्याची धुरा होती. दिवंगत यशवंतराव मोहिते राज्याच्या राजकारणात असल्याने त्यांनी कारखान्याच्या कारभारात फारसे लक्ष घातले नाही. शासनस्तरावर कारखान्यासाठी जी मदत लागेल ती भाऊंनी केली. त्यामुळे तब्बल ३० वर्षे अध्यक्ष म्हणून अप्पांनी काम पाहिले. त्यांनीही कारखान्याची मोठ्या प्रमाणात प्रगती केली. माळरानावर नुसतं गवत उगवणाऱ्या ठिकाणी पाणी नेले. कार्यक्षेत्रातील बांधाबांधावर पाण्याच्या स्किम तयार करून हरितक्रांती घडविण्याचे काम केले. अप्पांच्या कारभारावर भाऊंचा गाढ विश्वास होता. या कारखान्याच्या माध्यमातून अप्पांनी अनेक संस्था उभ्या केल्या. या पूरक संस्थाच्या माध्यमातून या भागाचा विकास व्हावा हा त्यांचा दूरदृष्टिकोन या भागाच्या विकासासाठी पूरक ठरला.
भाऊ-अप्पांची जोडी सर्व महाराष्ट्रभर परिचित होती. याला १९८७ साली नजर लागली. भाऊंकडे कारखान्याच्या कारभारासंदर्भात काही शेतकऱ्यांनी मुद्दे उपस्थित केले. आणि इथेच भावांतील संघर्ष सुरू झाला. सख्खे भाऊ एकमेकांवर आरोप करू लागले. १९८८ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तर आरोप-प्रत्यारोपाने सभास्थळी मोठा गोंधळ झाला. सभेसाठी जमलेले शेतकरी सभासद सैरभैर झाले. मिळेल त्या रस्त्याने पळू लागले. काही सभासदांना काठ्यांचा मारही खावा लागला. तेथून पुढे कृष्णाकाठी हे कुरुक्षेत्र खऱ्या अर्थाने सुरू झाले.
भावा-भावांतील संघर्षचा राजकीय फायदा घेण्याची संधी काकांनी सोडली नाही. अशातच १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत यशवंतराव मोहिते यांचे चिरंजीव डॉ. इंद्रजित मोहिते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. कारखान्याच्या सत्तेच्या जोरावर आपणाला भविष्यात त्रास होणार हे उंडाळकरांनी ओळखले. त्या विधानसभेच्या निवडणुकीत भोसलेंबरोबर बेरजेचे गणित जुळवल्याने काका विजयी झाले, तर डॉ. मोहिते यांचा पराभव झाला. मात्र काकांनी आगामी काळातील आपले विधानसभेचे समीकरण निश्चित केले. विधानसभेला जे आपल्याला मदत करतील त्यांना कृष्णेच्या निवडणुकीत मदत करायची अशी भूमिका घेतली. तेथून पुढच्या काही निवडणुकांमध्ये कधी भोसलेंना तर कधी मोहितेंना साथ देत कारखान्यात सत्तांतरे घडवली. जिकडे काका तिकडे गुलाल असे समीकरण लोक त्या वेळी म्हणत होते. अगदी २०१० च्या पंचवार्षिक निवडणुकीत अविनाश मोहिते सत्तेवर आले. तर गेल्या निवडणुकीतही डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॕॅनेल सत्तेत आले. त्या वेळपर्यंत हे समीकरण सत्यात उतरल्याचे सिध्द झाले आहे. मात्र काकांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे काँग्रेसच्या गोटात एकत्र बसले आहेत. आघाडी झाली तर दोन्ही डॉ. इंद्रजित व अविनाश मोहिते आणि उंडाळकर गट एकत्र लढतील अशी चर्चा आहे. मात्र मनोमिलन नाही झाले तर उंडाळकर गट कोणाला साथ देणार, असा प्रश्न आजतरी गुलदस्त्यात आहे. तर काकांची परंपरा कायम ठेवण्यात मोहिते व उंडाळकरांची नवी पिढी यशस्वी होते का याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. हे राजकीय गणित कसे जुळणार हे येणारा काळच ठरवेल.