सातारा : मनोमिलन भंगल्यानंतर सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीच्या नेत्यांनी या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देऊन जुन्या लोकांना विश्रांती दिल्याचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट झाले. दोन्ही आघाड्या एकमेकांसमोर असल्या तरी भाजपनेही सर्व जागेवर उमेदवारी अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांसमोर दिग्गज उमेदवार उभे करण्यात आले आहेत. आघाडीच्या दोन्ही नेत्यांनी काही ठिकाणी रिस्क घेतल्याचे दिसत आहे. त्यातच अपक्ष उमेदवारांचाही भरणा जास्त आहे. त्यामुळे सहजासहजी साविआ अन् नविआला ही निवडणूक वाटते तितकी सोपी जाणार नाही. नासीर शेख, रमेश जाधव आणि जर्नादन जगदाळे हे तिघे सातारा विकास आघाडीतून नगर विकास आघाडीत गेल्यामुळे साविआला धक्का बसला आहे. एवढेच नव्हे तर नगरसेविका सुवर्णा पाटील, आशा पंडित तसेच रवींद्र झुटिंग हेही सातारा विकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. मात्र, सुवर्णा पाटील आणि आशा पंडित यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर रवींद्र झुटिंग हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. साविआतून हे सहा दिग्गज उमेदवार इतरत्र विखुरल्याने साविआला मोठा झटका मानला जात आहे. नगर विकास आघाडीतून मात्र एकमेव वसंत लेवे हे फुटून सातारा विकास आघाडीमध्ये गेले आहेत. त्यामुळे नविआच्या उमेदवारांमध्ये फारसा बदल झाला नाही. परंतु तरीही नविआने २२ तर साविआने १९ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. काही ठिकाणी पूर्वीचेच उमेदवार आहेत तर काही ठिकाणी पूर्वीच्या उमेदवारांचे बहीण, भाऊ, पत्नी अशा नातलगांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजकीय पार्श्वभूमी आणि उमेदवाराचे कर्तृत्व पाहूनच नेत्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देताना खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी) या लढती होणार चुरशीच्या ! साविआच्या स्मिता घोडके आणि नविआकडून जयवंत भोसले यांच्या पत्नी ज्योती भोसले तर विजय बडेकर आणि विनोद (बाळू) खंदारे, अविनाश कदम आणि वसंत लेवे, प्रशांत आहेरराव आणि अमोल मोहिते यांच्या लढती अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.
जुन्यांना नव्यांचे आव्हान
By admin | Published: October 30, 2016 11:15 PM