कऱ्हाड : भाजप सरकारमधील राज्यातील ज्येष्ठ नेते, सहकार अन् बांधकाममंत्री चंद्र्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता ज्येष्ठ नेते मदनदादा मोहिते यांची सदिच्छा भेट घेतली. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचीही यावेळी उपस्थिती होती. या चौघांच्यात रेठरे येथे सुमारे अर्धा तास कमराबंद चर्चा झाली खरी; पण त्याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र, या भेटीबद्दल कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात तर्क-विर्तक लढविले जात आहेत. कऱ्हाड तालुक्याच्या राजकारण्यात गेल्या काही दिवसांपासून बरीच उलथापालथ होऊ लागली आहे. भोसले-उंडाळकरांच्या ‘मैत्रिपर्वा’ला पूर्णविराम तर मिळाला आहेच. पण त्याबरोबर मोहिते-भोसले ‘मनोमिलना’चे वारेही जोरात वाहू लागले आहे. मात्र, याबाबत मोहते-भोसले परिवारातील एकाही सदस्याने आतापर्यंत कोणतीच वाच्यता न केल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. गत विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुल भोसलेंनी भाजपचे ‘कमळ’ हातात धरल्याने ज्येष्ठ नेते मदनदादा मोहिते व डॉ. इंद्रजितबाबा मोहिते यांनी मनोमिलनाला छेद देत काँग्रेसच्या पृथ्वीबाबांचे ‘हात’ बळकट करण्याचा निर्णय घेतला. दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ आले खरे; पण त्यांच्या प्रचारात आघाडीवर असणारे मदनदादा मात्र गत वर्षभरापासूनच थोडेसे ‘नाराज’ दिसत होते. त्यांनी काही जाहीर सभांमधून आपली ‘नाराजी’ व्यक्त करीत स्वकीयांनाच ‘कानपिचक्या’ दिल्या होत्या. मात्र, त्यावर ‘चिंतन’ झाल्याचे दिसत नाही. म्हणूनच आज मदनदादांनी काहीही न बोलता स्वकीयांचीच ‘चिंता’ वाढविल्याचे दिसत आहे.विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्याच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या. उंडाळकर-भोसले मैत्रिपर्वाला नव्याने सुरुवात झाली. पण होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर त्याला पूर्णविराम मिळाल्याचे दिसते. मात्र, पृथ्वीबाबांकडे मदनदादा समाधानी नाहीत, हे ओळखून पुन्हा मनोमिलनाची चाल धूर्तपणे खेळली जात आहे. आजच्या चंद्रकांतदादांच्या या भेटीने या मनोमिलनाच्या चर्चेला दुजोराच मिळत आहे.दुपारी तीन वाजता डॉ. अतुल भोसले मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना घेऊन रेठरे येथील मदनराव मोहिते यांच्या ‘माधव निवास’ या बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर काही वेळाने डॉ. सुरेश भोसलेही येथे दाखल झाले. औपचारिक पाहुणचार झाल्यावर सुमारे अर्धा तास या चौघांच्यात कमराबंद चर्चा झाली. या दरम्यान, काय बोलणे झाले समजायला मार्ग नाही. (प्रतिनिधी)
मदन‘दादां’च्या भेटीला चंद्रकांत‘दादा’!
By admin | Published: January 30, 2017 11:44 PM