सातारा - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाला होता. शिंदेंनी या पराभवाचे खापर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर फोडले होते. जावळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच नेते ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदेंचा पराभव केला होता. त्यामुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज रांजणे यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.
मी विद्यार्थी चळवळीतून आलेला माणूस असून संघर्ष करत इथपर्यंत आलोय. त्यामुळं संघर्ष करणाऱ्या माणसाबद्दल मला अप्रूप असतं. मी तशा लोकांना भेटतो. मी त्यांना भेटल्यामुळं रांजणेंची निष्ठा बदलत नाही. कुठल्याही दबावाला ते बळी पडले नाहीत याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आलो, असं पाटील यांनी सांगितलं. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्रे भाजपकडे येत असतील तर लागेल ती मदत करू, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे पाटील यांनी रांजणेंना कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांचं तोंड गोड केलं.
आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका..
जिल्हा बँकेच्या राजकारणात कायम किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या शशिकांत शिंदे यांना यंदा बँकेत प्रवेश करून द्यायचाच नाही, असा निर्धार नेतेमंडळींनी केला होता. त्याच हेतूने अनेक मंडळी गेल्या वर्षभरापासून कार्यरत होती. त्यांनी कोरेगाव आणि जावळी तालुक्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यूहरचना केली होती. कोरेगाव तालुक्यातून आमदार शशिकांत शिंदे हे निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी करायची आणि जावळीत त्यांच्या विरोधी कोणी उमेदवारी करायचे हे सर्व अगोदर ठरले होते. हे निवडणूक निकालानंतर टप्प्याटप्प्याने समोर येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुरू झालेल्या पराभवाची मालिका खंडित होण्याचे नाव घेत नाही. जिल्हा बँक निवडणुकीत जावळी आणि कोरेगावातील पराभव हा आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका मानला जात आहे.
शिवेंद्रराजेंची शिंदेंवर टीका
राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचे कान भरले आहेत. याच कारणाने अनेक लोक त्यांच्यापासून दुरावले. यातूनच जिल्हा बँकेमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी आपल्या पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नये, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, जिल्हा बँकेत पराभव का झाला, याचे आत्मपरीक्षण शशिकांत शिंदे यांनी करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.