खंडाळा : खंडाळा नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. पहिल्याच निवडणुकीत विजयाची गुढी उभारता यावी यासाठी उमेदवारांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यात सोमवारच्या त्रिपुरारी पौर्णिमेचीही भर पडली. देवताळी उमेदवारांनी पौर्णिमेच्या निमित्ताने धार्मिक स्थळी भेट देऊन देवदेवतांचे दर्शनही घेतले आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळावं यासाठी पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं विजयाचं साकडंही घातलं. मात्र, उमेदवारांच्या सुरू असलेल्या या कसरतींची चर्चा शहरात चांगलीच रंगू लागली आहे. खंडाळा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ४९ उमेदवारांनी दंड थोपटल्याने राजकीय पटलावर चांगलाच रंग भरू लागला आहे. वास्तविक प्रभाग रचनेचे क्षेत्र अतिशय कमी असल्याने सकाळी आणि रात्रीच प्रचारावर भर दिला जातोय. दिवसभराच्या मोकळ्या वेळेत पुढील रणनीती आखणी, पक्षीय पातळीवरील बैठका, निवडणुकीचा खर्च सादर करणे, प्रचार यंत्रणेच्या साहित्याची जमवाजमव या विविध कामांकडे लक्ष दिले जात आहे. मात्र, प्रचारादरम्यान असलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने उमेदवारांनी मोर्चा धार्मिक स्थळांकडे वळविला. मंदिराच्या प्रांगणात आभाळाकडे नजर टाकून चंद्र आहे साक्षीला याची आठवण ठेवीत देवा तुझ्या दारी आलो विजयासाठी असं गीत आळवीत देवापुढं दंडवत घातले. शेवटी भावना ज्याच्या त्याच्या मात्र धामधुमीतही देवाची आठवण राहते. खंडाळा नगरपंचायतीमध्ये काँग्रेससमोर राष्ट्रवादीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. मात्र, काँग्रेसच्या सध्यातरी सुरू असलेल्या छुप्या प्रचाराची गणिते उलगडणे विरोधकांना अडचणीचे ठरत आहे. त्यातच यावेळी भाजपा आणि शिवसेनेनेही निवडणुकीत उडी घेतल्याने त्याचा फटका नेमका कोणाला बसणार याचा. ताळमेळ अजून तरी प्रमुखांच्या ध्यानी येत नसल्याने प्रचारात पेचप्रसंग निर्माण होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनीच मैदानात झेप घेतल्याने प्रचारासाठी ते आपापल्या प्रभागात अडकून पडले आहेत. त्यामुळे इतर उमेदवारांना आपल्या प्रचाराची गाडी एकट्यालाच हाकावी लागत आहे. सकाळ संध्याकाळ घरभेटींनी प्रचाराची रणधुमाळी उठवली जात आहे. (प्रतिनिधी)
चंद्राच्या साक्षीनं देवापुढं विजयाचं साकडं
By admin | Published: November 15, 2016 11:50 PM