माणिक डोंगरेमलकापूर : येथील कृष्णा हॉस्पिटलसमोर असणारा उड्डाणपूल पाडण्याची तयारी झाली आहे. सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून महामार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत. पूल पाडण्याचे काम बुधवारी रात्रीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे साताऱ्याहून कोल्हापूरकडे व कोल्हापूरहून साताऱ्याकडे मलकापूर उड्डाण पुलावरून जाणारी वाहतूक बुधवारी रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती डी. पी. जैन कंपनीचे अधिकारी सत्येंद्रकुमार वर्मा यांनी दिली.वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडे जाणारी जड वाहतूक भादी हार्डवेअर येथील यू-टर्नऐवजी कोल्हापूर नाकामार्गे ढेबेवाडी फाटा येथे यू-टर्न घेऊन कोल्हापूर नाकामार्गे वारुंजी फाट्यावरील ओव्हरब्रीजवरून सातारा बाजूकडे जातील. हायवेवरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक अक्षता मंगल कार्यालय येथून सेवारस्त्यावर येऊन गंधर्व हॉटेलपासून सेवारस्त्याने जाऊन पुन्हा हायवेला मिळतील. कोल्हापूर ते साताराकडे जाणारी वाहने कोयना औद्योगिक वसाहत समोरून सेवारस्त्यावर येऊन सरळ सेवारस्त्याने जाऊन पंकज हॉटेलच्या पश्चिम बाजूस हायवेला मिळतील व तेथून कोयना नदीवरील पुलावरून साताऱ्याकडे जातील. यापूर्वीचा भादी हार्डवेअरसमोरील यू-टर्न रद्द करण्यात येत आहे. ढेबेवाडी फाट्याच्या उत्तरेस असलेला व मलकापूर फाटा येथील असलेला लहान भुयारी मार्ग बंद करण्यात येईल. यापूर्वीच्या अधिसूचनेप्रमाणे वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल व कोयना औद्योगिक वसाहत ते वारुंजी फाट्यापर्यंत एकेरी वाहतूक राहील व या रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी वाहने पार्क करता येणार नाहीत. ढेबेवाडी फाटा व कृष्णा हॉस्पिटलच्या समोरील उड्डाण पुलाखालचा मार्ग खुला राहील. वाहतूक मार्गातील बदलासाठी सर्व नागरिकांनी नोंद घेऊन पोलिस दलास सहकार्य करावे, असे आवाहन कऱ्हाड वाहतूक नियंत्रण शाखा, डी. पी. जैन कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.
Satara News: मलकापुरातील उड्डाण पूल पाडण्यासाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या नवा वाहतूक मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 12:38 PM