सातारा : गणेश विसर्जनामुळे सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत पोलिसांनी तात्पुरत्या स्वरुपात बदल केला आहे. हा वाहतूक बदल रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत राहणार आहे.
गणेश विसर्जन काळात राजपथावरील कमानी हौद ते मोती चौकापर्यंतचा मार्ग वाहनांसाठी बंद असणार आहे. तसेच कमानी हौद ते शेटे चौक, शेटे चौक ते शनिवार चौक, मोती चौक ते राधिक टॉकिज, प्रतापगंज पेठ ते मोती तळे आणि शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका हे मार्ग वाहनांसाठी बंद असणार आहेत. समर्थ मंदिर ते चांदणी चौक या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश असणार नाही. तसेच बोगदा ते शाहू चौक हा मार्ग एसटीसह अवजड वाहनांसाठी बंद राहील. सज्जनगड, कासकडे जाणारी-येणारी जड वाहने शेंद्रे मार्गे जातील.
वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार बोगदा, समर्थ मंदिरकडून चांदणी चौक मार्गे बसस्थानकाकडे जाणारी वाहने (जड व अवजड वगळून) ही चांदणी चौक राजवाडा मार्गे न जाता समर्थ मंदिर, अदालतवाडा, शाहूचौक मार्गे बसस्थानकाकडे जातील. मोळाचा ओढा येथून शहरात येणारी वाहने महानुभव मठ, भूविकास बँक चौकमार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्वर मंदिर- राधिका टॉकीज, राधिका रस्त्याने बसस्थानकाकडे जाणारी वाहने कोटेश्वर मंदिर- शाहूपुरी-मोळाचा ओढा मार्गे बसस्थानकाकडे जातील. मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहू चौक-अदालत वाडामार्गे समर्थ मंदिरकडे मार्गस्थ होतील.
..........................................................