वडूज : ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने सोमवार, दि. १८ रोजी वडूज शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली असून, मतमोजणी केंद्रापासून पाचशे मीटर अंतरावरील सर्व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित ७६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार, दि. १५ रोजी ७६.८० टक्के मतदान झाले. सोमवार, दि. १८ रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीअनुषंगाने वडूज शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून, तो खालील प्रमाणे :
मेट्रो चौक ते पंचायत समिती परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद. (मतमोजणी ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावरील सर्व हॉटेल्स व दुकाने बंद राहतील.) साताराकडून वडूजकडे येणाऱ्या वाहनांची पार्किंग सोय अक्षता मंगल कार्यालय परिसर, पेडगाव रस्त्याकडील वाहनांना वडूज आगाराच्या बाजूला मैदानावर पार्किंग व्यवस्था केलेली आहे. कऱ्हाडकडून वडूजकडे येणाऱ्या वाहनांची सोय जोतिबा मंदिर व समोरील वनीकरणात केलेली आहे. तसेच पुढे जाणाऱ्या वाहनांकरिता वडूज आगार मैदान, तसेच दहीवडीकडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची सोयही एसटीच्या मोकळ्या मैदानात केलेली आहे.
मतमोजणी ठिकाणापासून प्रतिबंधित परिसरात गुलाल उधळण तसेच जमावबंदी आदेश लागू आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी केले.
१७वडूज
फोटो: खटाव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीदरम्यान वडूजमधील वाहतुकीत बदल केल्याचे दिशादर्शक नकाशात दाखविले आहे.