चाफळ : शेतकरी कुटुंबातील कन्येने जिद्द, चिकाटी व आत्म-विश्वासाच्या जोरावर कुस्तीमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. साक्षी प्रमोद पाटील असे तिचे नाव आहे. तिची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.चाफळ येथील समर्थ विद्या मंदिरात साक्षी इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. तसेच गावातीलच तालीम संघाची ती मल्ल आहे. साक्षीचे वडील प्रमोद व चुलते संजय हे पैलवान. त्यामुळे आपल्या मुलांनी कुस्तीची परंपरा अखंडित ठेवत पैलवानकी शिकली पाहिजे, यासाठी त्यांनी मुला-मुलीमध्ये भेदभाव न करता कुस्ती आखाड्यासाठी साक्षीची निवड केली. परंतु गावातील तालीम बंद पडल्याने सराव कुठे करायचा, हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न होता. साक्षीबरोबर गावातील इतरही मुलांसाठी तालमीची आवश्यकता होतीच. पुढे गावातील ज्येष्ठ पैलवान मंडळींना एकत्र करीत गावात कुस्तीचा आखाडा सुरू करण्यात आला. यासाठी गावातील संभाजीराव देशमुख यांच्यासारख्या समाजसेवकांनीही पुढाकार घेतला. अखेर याच तालमीची लाल माती आज साक्षीच्या रुपाने गावाचा नावलौकिक वाढवत आहे.साक्षीने आत्मविश्वासाच्या जोरावर चाफळच्या तालीम संघाचे नाव नावारुपास आणले आहे. सध्या ती सह्याद्री कुस्ती संकुल पुणे येथे सराव करत आहे. आठवीत शालेय शिक्षणाचे धडे शिकणाºया साक्षीने १५ वर्षे वयोगटांतर्गत ३९ किलो वजन गटातील राष्ट्रीय निवड चाचणीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिची उत्तरप्रदेश येथे होणाºया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.आई, वडील, चुलते यांच्यासह चाफळ तालीम संघाचे सर्व मार्गदर्शक, वस्ताज, पुणे येथील सह्याद्र्री कुस्ती संकुलचे विजय बराटे व कुस्ती कोच संदीप पठारे, अश्विनी बोराडे आदींच्या अथक परिश्रमामुळेच मला हे यश मिळाले आहे. यापुढेही गुरूजनांच्या आशीर्वादाच्या जोरावर कुस्तीमध्ये यश मिळवून चाफळ गावचा लौकिक वाढविणार आहे.- साक्षी पाटील, मल्ल, चाफळ
चाफळच्या कन्येची परराज्यात दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:51 PM