हणमंत यादवचाफळ : गत दोन वर्षीपासुन कोरोना पार्श्वभूमीवर बंद असणारा सडावाघापुर येथील उलटा धबधबा यावर्षीपासून पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. वर्षापर्यटनासाठी याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या २० पर्यटकांवर चाफळ पोलिसांनी कारवाई केली. चाफळ विभागातील दाढोली - गमेवाडी - चाफळ रस्त्यावर नाकाबंदी करत पोलिसांनी हुल्लडबाज पर्यकांवर दंडात्मक कारवाई करत दहा हजार रुपयांचा दंड वसुल केल्याची माहिती पोलीस अंमलदार सिध्दनाथ शेडगे यांनी दिली.सडावाघापूर येथील उंच डोंगर पठारावर उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी होत आहे. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना काही पर्यटक हुल्लडबाजी करत आहेत. गत दोन वर्षीपासुन कोरोना पार्श्वभूमीवर बंद असणारा हा उलटा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी परिसरात पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मात्र, रिमझिम पावसात काही पर्यटक मद्यपान करुन बेभान होवून दुचाकी गाड्या पळवत आहेत. याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.या हुल्लडबाज पर्यटकांवर चाफळ पोलिसांनी मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करत दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई यापुढे अशीच सुरु राहणार आहे.
पर्यटकांनी जरुर या निसर्गाच्या अदभूत परिसराचा आनंद घ्यावा. मात्र, सार्वजनिक शांततेचा भंग न करता या पर्यटन पढंरीत वावरावे. जर कोणी हुल्लडबाजी केली तर त्यांच्यावर कारवाई करु. - सिध्दनाथ शेडगे, ठाणे अंमलदार चाफळ