चाफळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मेपासून कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या सुधारित
आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना चाफळ पोलिसांनी मंगळवारपासून
रस्त्यावर खडा पहारा ठेवला आहे. दरम्यान, रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या सुमारे
३० दुचाकी गाड्या जप्त करत वाहनधारकांवर चाफळ पोलिसांनी दंडात्मक
कारवाई केली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह
यांनी लॉकडाऊनचे सुधारित आदेश पारित केल्यानंतर उंब्रज पोलीस ठाण्याचे
सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ बिटाचे अमृत
आळंदे, सुशांत शिंदे व होमगार्ड यांनी मंगळवारपासून चाफळ विभागात कडक
अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच चाफळ-पाडळोशी या मुख्य
रस्त्यासह चाफळ गावात प्रवेश करणाऱ्या मार्गावर खडा पहारा ठेवला आहे. लॉकडाऊन काळात कडक निर्बंध लागू केलेले असताना विभागातील काहीजण राजरोसपणे
नेहमीच्या फिल्मी स्टाईलमध्ये दुचाकी गाड्या चालवत आहेत. या महाभागांना
चाफळ पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवत मंगळवारी विनाकारण रस्त्यावर मोकाट
फिरणाऱ्या सुमारे ३० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे मोकाट फिरणारांना चांगलाच दणका बसला आहे.
दरम्यान, चाफळ व परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा कठोर
कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहन जप्तीसारखे कटू प्रसंग टाळण्यासाठी
नागरिकांनी घरातच राहावे, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अथवा
कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. यावेळी कोणाचीही गय केली जाणार नाही, असा
इशारा चाफळ बिटचे पोलीस नाईक अमृत आळंदे यांनी दिला आहे.