सातारा : मूठभरांच्या विकृत मनोवृत्तीमुळे ओशाळलेल्या चारभिंती आज पुन्हा अभिमानाने जागृत झाल्या. ‘लोकमत’नं केलेल्या आवाहनानंतर शहरातील तरूणाई पुढं सरसावली. धर्मवीर युवा मंच आणि संतोष मिसाळ मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी सकाळी चारभिंतीवरील मजकूर रंगाने खोडण्यात आला. पवित्र पांढऱ्या रंगामुळे हा परिसर जणू ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ बनला. भविष्यात चारभिंतीवर असे लिहिणाऱ्यांना समज देण्याचाही निश्चय व्यक्त केला. ‘मराठ्यांची राजधानी’ असलेल्या सातारा शहराला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या चारभिंतीचे अलीकडच्या काळात काही विकृतांकडून विद्रूपीकरण सुरू झाले होते. महिलांबरोबरच संवेदनशील पुरुषांनाही वाचताना लाज वाटावी, अशी भाषा आणि असे काही शब्द येथे सर्रास लिहिले जात होते. याविषयी ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात ‘चला... चारभिंतीवरचा डाग पुसू या!’ या मथळ्याखाली ‘हॅलो एक’ पानावर वृत्त प्रसिध्द केले. हे वृत्त वाचल्यानंतर येथील ‘धर्मवीर युवा मंच’चे प्रशांत नलवडे आणि ‘संतोष मिसाळ मित्र परिवार’चे संतोष मिसाळ यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला. ‘चार भिंतीचे होणारे हे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच. तूर्त या अश्लिल शब्दांवर पांढरा रंग लावून हे सगळे पुसून काढू,’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सकाळी ११ वाजता सुमारे पंधरा जणांची ही फौज हातात रंगाचा डबा आणि ब्रश घेऊन चारभिंतीवर पोहोचली. त्यानंतर तेथे लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर पांढरा रंग लावून या तरूणांनी या वास्तूचे विद्रूपीकरण पुसण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. युवकांच्या या चमूने केलेल्या या रंगरंगोटीमुळे चार भिंतीचे झालेले विद्रूपीकरण पुसले गेले असले तरी भविष्यात येथे असे कोणी काही लिहिणार नाही, यासाठीही कायमस्वरूपी काही तजवीज करणेही आता आवश्यक बनले आहे, अशी प्रतिक्रियाही यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी) युगुलांसह विद्यार्थीही बुचकळ्यात चारभिंतीवर सकाळच्या वेळी वावरण्याचा हक्क जणू प्रेमीयुगुल अन् विद्यार्थ्यांचाच आहे, असं आजपर्यंतचं चित्र होतं. मात्र, अश्लील शब्द मुजविण्यासाठी जेव्हा दहा-पंधरा युवकांचा ताफा चार भिंतीवर पोहोचला, तेव्हा सर्वांचीच पाचावर धारण बसली. ‘आज सकाळी सकाळी एवढी मूलं का आली?’ हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळं प्रेमीयुगुलांनी शाहूनगरचा रस्ता धरला.. तर महाविद्यालयीन टोळके स्मृतिस्तंभाच्या पुढे उभे राहून हे कार्यकर्ते कधी जातात, याची वाट पाहत अस्वस्थपणे उभे होते. चारभिंतीवर येऊन आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीचे नाव लिहिणे अत्यंत चुकीचे आहे. हे कृत्य म्हणजे वास्तू आणि संबंधितांच्या प्रेमाचे बाजारीकरण करणे आहे. आपले प्रेम सार्वजनिक मालमत्ता नाही, म्हणूनच त्याची जाहीर चर्चा किंवा जाहिरात अशा ऐतिहासिक वास्तूंवर केली जाऊ नये. ज्यांचे प्रेम खरे आहे, त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव स्वत:च्या हृदयात कोरावे, म्हणजे ते कोणी बघणार नाही आणि ते पुसण्याचेही कोणाचे धाडस होणार नाही. - संतोष मिसाळ, मित्र परिवार, अध्यक्ष, सातारा
चार भिंतीवर तरुणांच्या काही टोळक्याने केलेले लिखाण वाचून लाजेने मान खाली जाते. चारभिंतीवर रेखाटलेले अश्लील शब्द आता काही तरुणांनी पुसले आहेत. पण असे करताना जर पुन्हा कोणी सापडले तर भाजपाचे कार्यकर्ते संबंधितांना कायमची अद्दल घडविण्यासाठी मागे-पुढे बघणार नाही. फिरायला येणाऱ्यांनीही ऐतिहासिक वास्तूचे विद्रूपीकरण सहन करू नये. - विजय काटवटे, भाजप, सातारा